दोन दिवसांत मदतीचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अस्मानी संकटातील बळीराजाला वचन

अतिवृष्टीचे संकट महाकाय आहे. पण धीर सोडू नका, खचून जाऊ नका. या संकटाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱयांच्या पाठीशी ठाम उभे आहे. मी येथे आकडे लावायला आलो नाही. मदत करणार म्हणजे करणारच! येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय घेणार, असे वचनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना दिले. आता सणासुदीचे दिवस आहेत. या आनंदाच्या काळात शेतकऱयांच्या डोळ्यांत अश्रू ठेवणार नाही, असा दिलासा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

गेल्या आठवडय़ात अतिवृष्टीने मराठवाडय़ातील उभ्या पिकांची धूळधाण उडवली. शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास कोपलेल्या निसर्गाने हिरावून नेला. घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱयांवर अस्मानी संकट कोसळले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका धाराशीव, लातूर जिह्याला बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी धाराशीव जिह्यात काटेगाव, अपसिंगा व कात्री या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱयांशी संवाद साधला. त्यानंतर तुळजापूर येथे प्रशासकीय आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंकरराव गडाख, रोहयो मंत्री संदीपान भूमरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, पैलास घाडगे आदींची उपस्थिती होती.

पीक विमा कंपन्यांना बोलावणार
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणावर पीक विमा घेतला आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या काळात पीक विमा कंपन्यांनी हात आखडता घेता कामा नये. त्यासाठी पीक विमा कंपन्यांना बोलावणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोरोनावर जे महाराष्ट्रात झाले ते इतर राज्यांत दिसले नाही
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने आणि वेगाने जम्बो हॉस्पिटल्स, टेस्टिंग लॅब उभ्या केल्या. महाराष्ट्राने जे केले ते इतर राज्यांत दिसले नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम याच कामाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच एका ठिकाणी एका चिमुकलीशी संवाद झाला. शाळा सुरू झाल्या पाहिजेत हे खरे आहे. पण कोरोनाचे संकट मोठे आहे. युरोपसह काही पाश्चिमात्य देशांत कोरोना गेला म्हणून सगळे निर्धास्त झाले. शाळा उघडल्या. पण कोरोनाने पुन्हा आपला इंगा दाखवला. आता तेथे पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी चालू आहे, असे ते म्हणाले.

कर्जाच्या पर्यायांचा विचार सुरू
तेलंगणातील सरकारने शेतकऱयांना लगेचच मदत दिली, चांगली गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्राचे हक्काचे पैसे केंद्राकडे अडकले आहेत. जीएसटीचा परतावा वेळेवर मिळाला असता तर महाविकास आघाडीच्या सरकारनेही शेतकऱयांना लगेच मदत केली असती, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत देण्यासाठी कर्ज काढण्याच्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे सांगितले.

थिल्लर, चिल्लर गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळ नाही
माझे लक्ष अडचणीत असलेला शेतकरी आणि जनतेकडे आहे. त्यामुळे मला थिल्लर, चिल्लर गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.

आता सणासुदीचे दिवस आहेत. या आनंदाच्या काळात शेतकऱयांच्या डोळ्यांत अश्रू ठेवणार नाही!
अतिवृष्टीने शेतकऱयांवर मोठे संकट कोसळले आहे. माझे सरकार या संकटाच्या काळात शेतकऱयांच्या पाठीशी ठाम उभे आहे. आजच काही जणांना मदत दिली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल आला की मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल आणि दोन दिवसांत तत्काळ मदतीची घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मी येथे दौऱयात असलो तरी मुंबईत यावर काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

काटेगाव, कात्री, अपसिंगा येथे शेतकऱयांशी संवाद
अतिवृष्टीचे संकट भयानक आहे. पण धीर सोडू नका, खचू नका. काळजी करू नका तुम्हाला पुन्हे उभे करणार असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना दिला. सरकार मदत तर देणारच आहे, पण मी तुम्हाला दिलासा देण्यासाठी, आधार देण्यासाठी आलोय, मायेचा हातही त्यांनी शेतकऱयांच्या पाठीवरून फिरवला.

गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीचा धाराशीव जिल्हय़ाला मोठा फटका बसला आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी धाराशीव जिल्हय़ाच्या दौऱयावर आले होते. तुळजापूर तालुक्यातील काटगाव, अपसिंगा आणि कात्री येथे त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शेतकऱयांशी संवाद साधला. यावेळी नुकसानीची माहिती देताना शेतकऱयांना अश्रू अनावर झाले. यावेळी शेतकऱयांना दिलासा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटाच्या या काळात सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आपण सगळे मिळून या संकटावर मात करू अशी ग्वाही दिली. कोरोनाचे संकट, अतिवृष्टीचा तडाखा यातून सावरण्यासाठी शेतकऱयांना बळ दे, असे साकडे आपण तुळजाभवानीला घालणार असल्याचेही ते म्हणाले.

धाराशीव जिल्हय़ाच्या या पाहणी दौऱयात पालकमंत्री शंकरराव गडाख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.

शेतकऱयांना तातडीने मदत
काटगाव येथे उमाकांत भीमराव सुरवसे यांची पाच जनावरे पुरात वाहून गेली. त्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून 30 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. हरिदास कोडिंबा माळी, अरविंद लक्ष्मण माळी, धनाजी बाबूराव शिंदे यांच्यासह इतर शेतकऱयांना प्रशासकीय पातळीवर मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले. कात्री येथे अर्चना युवराज पाटील, हिराबाई दत्ता कटकधोंड, बोरने यांना 30 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या