केंद्राची मुस्कटदाबी राज्यांनी सहन करू नये! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

देशात राज्य आणि केंद्र संघर्ष सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा आहे. केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळय़ांनी निषेध करायला हवा. माझे आजोबा सांगायचे की, टीका जरूर करा, पण त्यातून ज्याच्यावर टीका करताय त्याच्यामध्ये शहाणपण यायला हवं. नुसतंच ओरबाडणं करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला. लोकांची कामे करण्यासाठी सत्ता दिली आहे. एकमेकांवर चिखलफेक करायची, वाट्टेल ते आरोप करायचे आणि म्हणायचे, बघा आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात राहणारे आहेत. हे सुदृढ लोकशाहीसाठी हानिकारक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दैनिक ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात संपादक गिरिश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून ते केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबाबत भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झालं आहे. सत्ता मिळवा, पण तीसुद्धा आपल्याकडे लोकशाही आहे हे न विसरता प्रामाणिकपणे लोकांसमोर जाउन लोकांनी सत्ता दिली तर तुम्ही राज्य करा. पण आता सगळं मला हवंच, हा प्रकार हानिकारक आहे.

कोरोनासारखीच भाजपलाही विकृती झाली आहे

केंद्र सरकारकडून सुरू झालेल्या गळचेपीबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गळचेपी होत असल्याचे  अनुभव येत आहेत. तुम्हाला केंद्रात संधी मिळाली आहे, राज्यात आम्ही मिळवली आहे म्हणा. पण त्यानंतर आम्ही जनतेची कामं थांबवली आहेत का? राज्यातल्या कोरोना काळातल्या कामांचं सर्वोच्च न्यायालयानं देखील कौतुक केलं आहे. त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले. काढा बाहेर मग. शोधा काय शोधायचं ते. कोरोनासारखी ही भाजपलाही विकृती झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचे असेल ते मला करणे भाग आहे!

भाजपसोबत युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती, पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला. कुणी कुणाला बांधील नसतं. आपण कुणासोबत आघाडीत असलो आणि तो पक्ष चुकत असला, तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल, ते मला करणं भाग आहे, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केली.

75 वर्षांत आपल्याकडून काय चुकले याचा विचार व्हायला हवा!

गेल्या रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री आले होते. यात भाजपा नको, यापेक्षा आम्हाला देश कसा हवाय, यावर चर्चा झाली. देशात कोणत्या पद्धतीने राजकारण चालायला हवं, देशाच्या राजकारणाला चांगली दिशा मिळायला हवी. गेल्या 75 वर्षात काहीच झालं नाही हे सांगितलं जात आहे. पण सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गेल्या 75 वर्षांत आपल्याकडून काय चुकलं, काय व्हायला हवं होतं यावर देशपातळीवर चर्चा व्हायला हवी, असे विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची कुवत आहे का?

महापालिकांच्या निवडणुका येत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर का होईना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी. छत्रपतींच्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची कुवत आहे का, असा सवाल करताना या भाषेसाठी दिल्लीसमोर हात पसरावे लागतायत, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने बदनामी चाललेय

इतर राज्यांत बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर या केंद्रीय यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. तुम्ही महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग का करत नाही. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललेय, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली

लवकरच मंत्रालयात येणार, अधिवेशनालाही हजर राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीअनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता,’ अशी टिपणी केली. ते पुढे म्हणाले, पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का असे वाटले नव्हते, पुन्हा येईन असं बोलून येणे यापेक्षा हे बरे आहे. आता बराचसा मार्गावर आलो आहे. राजकीय नव्हे, पण शारिरीक शक्तीपात झाला होता. पूर्वपदावर येतोय. जिद्द आणि हिंमत असल्यावर काहीच अशक्य नसतं. हत्ती गेला, शेपूट राहिलंय. ते गेलं की पुन्हा मंत्रालयात यायला सुरुवात करेन, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मधला कोरोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. पुढच्या आठवडय़ात अधिवेशन सुरू होतंय. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार. अधिवेशनातही मी जाणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मतं नाही मिळाली तरी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच हा प्रकार राजकारणात नव्हता. सत्तेच्या हव्यासाने देशाचे राजकारण नासवून टाकले आहे.

बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर केंद्रीय यंत्रणांकडे काहीच नाही का? धाडीमागून धाडी सुरू आहेत. प्रत्येकाचे दिवस असतात, पण दिवस बदलतातसुद्धा.

शिवसैनिक मुळात गरम रक्ताचा आहे. त्यामुळे जाऊ तिथे वॉर्मिंग होतंच. शिवसेना ग्लोबल नाही, तर नॅशनल वॉर्मिंग तरी करतच आहे.