लोकमान्य टिळक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

657

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे, यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या दोन्ही महापुरूषांकडे मत-हिंमत आणि किंमत होती. स्वतःचे मत होते आणि ते मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि त्याहीपलीकडे जाऊन होणारे परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हे सगळे पचविण्याची ताकत त्यांच्यात होती. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडले. निवडणूक-सत्ता-अधिकार नसताना देशाचे नेतृत्व करणे सोपे नव्हते, त्याकाळी जनजागृतीसाठी मीडियासारखे माध्यम नसताना जनतेला जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव सार्वजनिक केला. टिळकांच्या आयुष्यात अचूकतेला खूप महत्व होते. गणित आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचे प्रभुत्व होते. टिळकांच्या प्रेरणेच्या उर्मीने देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांना अपेक्षित असणारे स्वराज्य आपण निर्माण करणे अपेक्षित आहे.

अण्णा भाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही त्यांच्या साहित्यातून त्यांनी जनजागृती करून चळवळीला नवसंजीवनी देऊन एक चैतन्य निर्माण केले. शाळेत न गेलेल्या माणसाचे जन्मशताब्दी वर्ष विद्यापीठ साजरे करतेय. ही खूप प्रेरणादायी बाब आहे. आज या दोन्ही महापुरुषांच्या नावे मुंबई विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र चालू केले जात आहेत, ही चांगली बाब आहे. या दोन्ही महापुरुषांचा समर्थ वारसा घेऊन पुढचा इतिहास आपण निर्माण केला पाहिजे,असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी संगितले. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या