
मुंबईत हक्काचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. चिकाटी आणि जिद्द असली की काहीही करता येते हे पत्राचाळवासीयांनी दाखवून दिले आहे. या घरांसाठी संघर्ष करता करता अनेकजण आपल्यातून निघूनही गेले. आज या संघर्षानंतर तुमच्या हक्काच्या घराचे भूमिपूजन होत आहे. लवकरच घरही मिळेल. कृपा करून हे हक्काचे घर सोडू नका. केलेला संघर्ष विसरू नका आणि घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका. ही माझी अट आणि विनंती आहे असे समजा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्राचाळवासीयांना केले.
मागील अनेक वर्षांपासून रखडलेले पत्राचाळवासीयांचे पुनर्वसनाचे स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पूर्ण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, तर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गोरेगाव येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पत्राचाळ हा विषय अनेकांच्या माहितीचा आहे. गेली अनेक वर्षे त्याचे दळण दळले, पण प्रश्न सुटला नाही. आंदोलने झाली, काही लोक हा क्षण पाहायला आज हयातदेखील नाहीत. त्यांना विनम्र अभिवादन करतो. संघर्ष समिती भेटायला आल्यानंतर त्यांना हा प्रश्न सोडवण्याचे वचन दिले होते ते पूर्ण करत आहोत. अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज आपण साधतो आहोत. यासाठी सुभाष देसाई यांनी या कामाचा पिच्छा पुरवला होता. कॅबिनेटमध्येही हाच विषय ते काढत असत. कामे अनेक असतात, योजना अनेक असतात, अडचणी डोंगराएवढय़ा असतात, पण एखादी अडचण दूर करायची म्हटले तर तर ती दूर करून काम करता येते याचे पत्राचाळ पुनर्विकास हे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
थकलेल्या भाडय़ाचाही प्रश्न सुटला; सुभाष देसाईंच्या आवाहनाला प्रतिसाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळीच्या संघर्ष समितीला ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात हा प्रस्ताव आला. आता या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन खऱया अर्थाने पुनर्विकास मार्गी लागला आहे. त्यामुळे आता या संघर्ष समितीचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी जी थकलेल्या भाडय़ाबाबत मागणी केली आहे ती मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण करावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जितेंद्र आव्हाड यांनी पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला आणि पुढील प्रत्येक महिन्यासाठी भाडे दिले जाईल, असे आश्वासन दिले.
तीन वर्षांत घरे ताब्यात देणार – जितेंद्र आव्हाड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीत सांगितले की, आपल्याला पहिल्यांदा 672 लोक आणि लॉटरीमध्ये 306 घरे मिळालेले लोक हे जे अस्वस्थ आहेत त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणला पाहिजे. तुम्ही म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधायला का घेत नाही, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानुसार दर आठवडय़ाला बैठक घेऊन आढावा घेतला. पत्राचाळ ही ऐतिहासिक आहे. तीन ते चार पिढय़ा लोकांच्या इथे गेल्या आहेत. या सर्वांना मी आश्वासन देतो की, म्हाडावर विश्वास ठेवा. तीन वर्षांत तुमची घरे ताब्यात दिली जातील, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
स्वच्छ कारभाराचा निर्धार आहे, आरोपांची फिकीर करू नका – शरद पवार
मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टी हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दलची सोडवणूक करण्यासाठी धाडसाने प्रकल्प हाती घेतले पाहिजे. टीका टीपण्णी होईल, आरोप केले जातील, पण स्वच्छ कारभार करण्याचा आपला निर्धार असल्यामुळे आणि त्याच मार्गाने जाणार ही भूमिका स्पष्ट असल्यामुळे त्याची कधी चिंता करू नका. अनेकवेळा आरोप केले जातात, त्यात तथ्य नसतं. आरोप केले म्हणून काम करायचं थांबलो तर त्याचे दुष्परिणाम शेवटी सामान्य माणसाच्या विकासावर होतात. तेव्हा आरोपांची फिकिर करू नका विकासकामांना गदी द्या. ज्या ज्या ठिकाणी असे उपक्रम राबवणे शक्य आहे त्या ठिकाणी धाडसाने निर्णय घ्या. तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता उभी राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
माझ्यावरही आरोप झाले, पण ते खरे नाहीत हे सिद्ध झाले
‘मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात काम करतो. आम्ही महाराष्ट्रात आणि देशात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. कधीकाळी टीका–आरोप झाले, पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱयांना पुढे बोलता आलं नाही, असे शरद पवार म्हणाले.
चहाला बोलवायला विसरू नका
काही वर्षांतच हक्काच्या घरात राहायला जाल. हक्काच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर यासाठी केलेला संघर्ष विसरू नका. ज्यांना नवीन घर मिळणार आहे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या घरात राहायला गेल्यानंतर चहाला बोलवायला विसरू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासीयांना आपुलकीने सांगितले.
पोलिसांच्या घरांसाठी लक्ष द्या
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत, पोलिसांच्या जुन्या निवासी जागा आहेत. तेथील घरं वाईट स्थितीत आहेत. जागा मोठी आहे, पण घरं चांगल्या स्थितीत नाहीत. दिवसातील 16-16 तास काम करणाऱया या आपल्या रक्षकाच्या कुटुंबातील लोकांना चांगला निवारा देण्यासाठी तरी आपण लक्ष घालूयात, अशी सूचना शरद पवार यांनी यावेळी केली. गृहखातं आणि गृहनिर्माण खातं यांनी दोघांनी एकत्र बसावं, प्रस्ताव तयार करावा, त्याला काही प्रमाणात व्यावसायिक रूप देऊन त्यातून मिळणाऱया उत्पन्नातून पोलिसांच्या क्वार्टर्स बांधून घेता येतील. अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करून मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन या कामाला गती देण्याची भूमिका घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.