न्यूमोनिया लसीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

476

पाच आदिवासी जिल्ह्यांतील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देतानाच आरोग्याच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या सुरू असलेल्या योजनांना अधिकचा निधी देतानाच आरोग्य संस्थांची बांधकामे मुदतीत पूर्ण करण्याकरिता निधीची कमतरता जाणवू देणार नाही. जनतेला दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल झाले पाहिजेत अशा सूचना दिल्या. सादरीकरणादरम्यान प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आदिवासी भागात जिथे पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणची मुले न्यूमोनिया होऊन दगावण्याची शक्यता जास्त असते. त्यांना लसीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच पालघर, नंदुरबार, अमरावती, नाशिक आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लस देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे निर्देश दिले.

पायाभूत सुविधांप्रमाणे आरोग्यासाठीही निधी

पायाभूत सुविधांसाठी ज्या प्रकारे प्राधान्याने निधी दिला जातो तशाच प्रकारे आरोग्यासाठीही निधी देणार असून आदिवासी भागात सेवा बजावणार्‍या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांसाठी दर्जेदार अशी निवास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. आदिवासी भागात नियुक्ती केलेल्या डॉक्टरांच्या नियुक्तीच्या आदेशामध्ये बदलीच्या दिनांकाचाही उल्लेख करावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘आशा’ कार्यकर्त्या ग्रामीण आरोग्य सेवेचा कणा

आरोग्य विभागाच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी आशा कार्यकर्त्यांचा विशेष उल्लेख केला. ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी काम करणार्‍या आशा कार्यकर्त्या या ग्रामीण आरोग्याचा कणा आहेत असे त्यांनी सांगितले. ज्या आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिसकरिता रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे तेथे तिसरी शिफ्ट सुरू करावी. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या