भाजपातील अंतर्गत लाथाळ्यांमुळे मुख्यमंत्र्यांची सभा रद्द

सामना ऑनलाईन, पिंपरी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरीतील आंबेडकर पुतळा चौकामध्ये मंगळवारी होणारी सभा भाजपातील अंतर्गत संघर्षामुळे रद्द करावी लागली आहे. यामुळे मुख्यमंत्री जबरदस्त संतापल्याचे वृत्त आहे. भाजपाचे खासदार अमर साबळे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या संघर्षामुळे ही सभा रद्द करावी लागण्याची नामुष्की ओढवली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली सत्ता उलथवून टाकण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला होता. मात्र या सभा रद्द होण्याने त्यांच्या या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. सभा रद्द झाल्याने मुख्यमंत्री संतापले , ज्यामुळे मंगळवार ऐवजी आता १८ तारखेला पुन्हा पिंपरीमध्ये सभा घेण्याची धडपड सुरू झालीय. गर्दी जमवणे आणि सभेसाठी पैसा कोण खर्च करणार या मुद्दांवरून साबळे आणि जगताप गटात मतभेद झाले आणि त्याचा परिणाम म्हणून ही सभा रद्द झाली.  शिवाय तिकीट वाटपादरम्यान निष्ठावंतांना डावलल्याने ते नाराज असून त्यांनीही सभेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. सत्तेची स्वप्न बघणाऱ्या भाजपाच्या या अंतर्गत संघर्षामुळे मुख्यमंत्र्यांची सभा रद्द होणं हा पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या चर्चेचा आणि विनोदाचा मुद्दा बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या