CNBC आवाजच्या वृत्तनिवेदकावर सेबीने बंदी घातली, वाहिनीने नोकरीवरून काढून टाकले

सीएनबीसी आवाज या प्रसिद्ध अर्थविषयक वृत्तवाहिनीने त्यांच्या एका वृत्तनिवेदकाला नोकरीवरून काढून टाकले आहे. हेमंत घई असे या वृत्तनिवेदकाचे नाव आहे. घई यांच्यावर सेबीने विशिष्ट स्वरुपाची बंदी घातल्यानंतर वाहिनीने ही कारवाई केली आहे. सेबीने घई यांच्यावर पुढील आदेशापर्यंत शेअर बाजारातील कोणत्याही स्वरुपाच्या गुंतवणीकीबाबत किंवा शेअर बाजारासंदर्भात कोणताही शोध अहवाल प्रकाशित करण्यास मनाई केली आहे. सेबीने घई यांनी गैरमार्गाने जमा केलेल्या 2.35 कोटी रुपयांच्या उत्पन्नावरही स्थगिती आणण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरण नेमके काय आहे?

हेमंत घई हे सीएनबीसी आवाज नावाच्या वृत्तवाहिनीवर स्टॉक 20-20 नावाचा एक कार्यक्रम सहसंचालित करत होते. विशिष्ट सत्रामध्ये कोणते शेअर खरेदी करावेत ,कोणते शेअर विकावेत याचा सल्ला या कार्यक्रमातून दिला जात होता. सेबीने या कार्यक्रमाचे जानेवारी 2019 पासून 31 मे 2020 पर्यंततचे भाग तपासले होते. याच कालावधीमध्ये हेमंत घई, त्यांची पत्नी जया आणि हेमंत यांची आई श्याम मोहिनी यांची कमाई शेअर बाजारातील गुंतवणुकीतून वाढल्याचे सेबीला दिसून आल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमामुळे कोणते शेअर विकत घ्यावेत आणि कोणते विकावेत याची पूर्ण माहिती घई यांना होती. हेमंत घई यांनी या माहितीचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या आधार घेत हेमंत यांनी बायको आणि आईसह गैरमार्गाने उत्पन्न कमावल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. घई यांनी ज्या समभागांची त्यांच्या कार्यक्रमात शिफारस केली होती, ते शेअर त्यांनी आणि त्यांच्या आई किंवा पत्नीने एक दिवस आधीच खरेदी केल्याचं सेबीला दिसून आलं आहे. घई यांनी ज्या दिवशी या शेअरची शिफारस केली त्याच दिवशी त्यांनी, जया घई आणि आई श्याम मोहिनी यांनी घेतलेले शेअर विकून टाकल्याचं दिसून आलं आहे. यातून या तिघांनी फायदा कमावला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाहिनीनेही केली कारवाई

सीएनबीसी आवाज ही वृत्तवाहिनी नेटवर्क 18 समूहाद्वारे संचालित केली जाते. सेबीने केलेल्या कारवाईनंतर या वाहिनीने घई यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या वाहिनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. यामध्ये कोणताही कर्मचारी समभागांच्या किंमतीबाबत फेरफार करणार नाही अशी अट आहे. घई यांनीही या आचारसंहितेवर सही केली असल्याचं या वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.

सत्यनिष्ठतेबाबतची वृत्तवाहिनीची प्रतिबद्धता ही अढळ असल्याने अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही असं या वृत्तवाहिनीने घई यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर म्हटलं आहे. सेबीने हेमंत, जया आणि श्याम मोहिनी या तिघांना कोणतेही समभाग विकत घेणे , विकणे किंवा कोणत्याही स्वरुपाचा व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या