मुंबईत आली सीएनजीवरील दुचाकी

50

मुंबई – मुंबईच्या रस्त्यावर आता सीएनजीवर चालणार्‍या दुचाकी दिसणार आहेत. मुंबई आणि परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘हरित अभियान की ओर मुंबई महानगर’अंतर्गत महानगर गॅसने मेसर्स इको फ्युअल (लोवाटो) कंपनीच्या सहकार्याने दुचाकीसाठी खास सीएनजी कीट तयार केले आहे. हे सीएनजी कीट बसवलेल्या शंभर दुचाकींचे आज केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल येथे उद्घाटन झाले.

सीएनजी कीटमुळे दुचाकीस्वारांना महागड्या पेट्रोलऐवजी स्वस्त सीएनजीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. दुचाकीमध्ये सीएनजीचा वापर वाढणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगत यापुढे मुंबईतील कॉलेज तरुणांनी सीएनजी कीट फिटेड बाईक वापरल्यास त्यांना कार्बन क्रेडिट मार्क देण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे त्याचा तरुणांना पुढे फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले तर १२-१५ हजार रुपये किंमत असलेल्या सीएनजी कीटचा भार एकाच वेळी दुचाकीधारकांवर पडू नये म्हणून सरकारने काही प्रमाणात सूट किंवा सुलभ हप्त्यावर उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार पूनम महाजन यांनी केली. यावेळी उपमहापौर अलका केरकर, महाराष्ट्र नॅचरल गॅसचे संचालक राजेश पांडे, गेलचे एमडी बी. सी. त्रिपाठी, महानगर गॅसचे एमडी राजीव माथूर आदी उपस्थित होते. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, खारघर परिसरातील दुचाकीस्वारांना हे कीट बसवता येणार आहे.

दोन वर्षांत मुंबईत सर्वांना गॅस

मुंबईच्या काही परिसरात आजही एलपीजी गॅस पोहचत नाही. त्याचा त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत मुंबईतील प्रत्येकाला गॅस मिळेल. मग तो पावभाजीवाला असो की चाळीत राहणारी गृहिणी असो, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.

सीएनजी कीटची वैशिष्ट्ये

दोन सिलिंडरची व्यवस्था, त्यामध्ये १.२ किलो गॅस बसेल

शंभर ते सव्वाशे सीसीच्या दुचाकीला प्रतिकिलो गॅसवर सुमारे ९० किलोमीटरचे मायलेज

प्रतिकिलोमीटरचा सरासरी ६० पैसे

१२ ते १५ हजार रुपये सीएनजी कीटची किंमत

आपली प्रतिक्रिया द्या