आज संध्याकाळपर्यंत प्रशिक्षकाची निवड कराच – बीसीसीआय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘हिंदुस्थानी संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड आज संध्याकाळपर्यंत कराच’, असा दमच बीसीसीआय प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सल्लागार समितीला दिला आहे. सोमवारी झालेल्या मुलाखतीनंतर पत्रकारांशी बोलताना गांगुलीने प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी आणखी वेळ हवा असे म्हटले होते. तसेच कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असेही गांगुलीने स्पष्ट केले होते.

सल्लागार समितीतील सदस्य सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी सोमवारी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र प्रशिक्षकपदाबाबत कोणताही निर्णय न झाल्याने बीसीसीआयने आजच्या आज प्रमुख प्रशिक्षकाची निवड करण्याचे सल्लागार समितीला सांगितले आहे. विनोद राय यांनी बीसीसीआय बोर्डाचे सीईओ राहुल जौहरी आणि अमिताभ चौधरी यांच्याशी चर्चा करून प्रशिक्षकपदाचे नाव जाहीर करण्यास सांगितले आहे.

गांगुलीने कोहलीशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे असे म्हटले होते, याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राय यांनी, विराट कोहली या निवडीपासून दुर असून, याबाबत कोहलीने अजून काहीही मेसेज केलेला नाही. मात्र प्रशिक्षकपदाबाबत कोहलीचा निर्णयही विचारात घेतला जावा, असेही राय म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या