गुरूबिन ग्यान कहाँसे पाऊ!

260

जयेंद्र लोंढे

जेव्हा एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवायचे असते त्यासाठी चांगला गुरू मिळणे फार  भाग्याचे असते आणि गुरूलाही होतकरू, गुणी शिष्याचा नेहमीच शोध असतो. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सांगतेय आपले गुरू पुलेला गोपीचंद यांच्याविषयी तर क्रिकेटचे प्रशिक्षक दिनेश लाड सांगताहेत आपल्या शिष्यांविषयी….

युवा खेळाडूंमधील गुणवत्ता हेरून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवण्याचे काम हाती घेणाऱया प्रशिक्षक दिनेश लाड यांनी गेल्या २३ वर्षांत क्रिकेट प्रशिक्षणासाठीच सर्वस्व अर्पण केले आहे. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यामुळे त्यांच्या नसानसात क्रिकेट भिनले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत दिनेश लाड यांनी मुंबईच्या क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलाय. रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह विविध वयोगटांत मुंबईचे प्रतिनिधित्व केलेल्या जवळपास ५८ खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱया दिनेश लाड यांनी यावेळी क्रिकेटची सेवा अविरतपणे करण्याचे ध्येय असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले.

द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांचा आदर्श

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गुरू रमाकांत आचरेकर सरांच्या सान्निध्यात क्रिकेटचे बाळकडू घेतले. आमच्या सरांनी या खेळाला खूप काही दिले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवले. माझ्यासमोरही त्यांचाच आदर्श आहे. त्यासाठी अविरतपणे क्रिकेटपटूंना प्रशिक्षणाचे काम सुरु आहे. यापुढेही ते सुरूच राहील, असा ठाम विश्वास दिनेश लाड यांनी यावेळी व्यक्त केला.

बीसीसीआयने प्रशिक्षकांकडे लक्ष द्यावे!

सध्या क्रिकेटपटूंवर धनवर्षाव होत आहे. एखाद्या क्रिकेटपटूला स्थानिक स्पर्धांचे तिकीट मिळाल्यास त्याला लाखभर कमवता येतात. त्यानंतर राष्ट्रीय संघाचे किंवा आयपीएलचे दरवाजे उघडे झाल्यास त्या खेळाडूला कोटींची उड्डाणे घेता येतात. त्यात काही गैर नाही. पण त्या खेळाडूला कोणत्या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभत आहे, त्याकडेही बीसीसीआयने लक्ष द्यायला हवे. प्रशिक्षकांकडे दुर्लक्ष करू नये. प्रशिक्षकांना आर्थिक मदत करायला हवी. त्यांचा छोटासा सत्कार सोहळाही पार पाडल्यास चांगले वाटेल, अशी सूचना दिनेश लाड यांनी या वेळी केली.

…अन् रोहित, शार्दुलच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली

सध्या टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्मा व मुंबईचा सलामी गोलंदाज शार्दुल ठाकूर यांना घडवण्यात दिनेश लाड यांचा सिंहाचा वाटा आहे. या दोघांबाबत विचारले असता त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, रोहित शर्मा आपल्या काकांसोबत बोरिवली येथे राहायचा. शालेय स्तरावर त्याचा खेळ पाहून प्रभावित झालो. त्यानंतर त्याला मी क्रिकेटचे प्रशिक्षण देत असलेल्या गोराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये येण्यास सांगितले. त्याची आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती. त्यामुळे शाळेकडून त्याला फ्री शिप देण्यास सांगितले. यानंतर रोहित शर्माची एण्ट्री त्या शाळेत झाली. असाच काहीसा प्रकार शार्दुल ठाकूरबाबत घडला. तो पालघरला रहायला असल्यामुळे इतक्या दूरवर असलेल्या शाळेत येऊ शकत नव्हता. मात्र मला त्याची गोलंदाजी प्रचंड आवडलेली. त्यामुळे त्याला माझ्या बोरिवली येथील घरात राहण्यास सांगितले. त्याच्या घरच्यांनी माझ्या घरी राहण्याची परवानगी दिली अन् त्या वर्षात त्याला मुंबईच्या युवा संघाचे तिकीट मिळाले, असे दिनेश लाड पुढे सांगतात.

पैशांसाठी काम करीत नाही

क्रिकेट हा माझा श्वास आहे. गेली २३ वर्षे मी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे. मात्र आजपर्यंत कोणाकडूनही पैशांची मागणी केलेली नाही. मी मुळात त्यासाठी कामच करीत नाही. रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, हरमीत सिंग या स्टार खेळाडूंसह मुंबईच्या विविध वयोगटांमध्ये सहभागी झालेल्या जवळपास ५८ खेळाडूंना प्रशिक्षण दिले. याचा आनंद निराळाच आहे, असे भावूक उद्गार दिनेश लाड यांनी काढले.

पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटनपटू)

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावून इतिहास रचणाऱया पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूला वयाच्या दहाव्या वर्षापासून पुलेला गोपीचंद या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळत आहे. वयाच्या २१ वर्षांपर्यंत  आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्तरावर धडाकेबाज कामगिरी करणाऱया शटलक्वीन पी. व्ही. सिंधूने यावेळी आपले गुरू ‘गोपीचंद सर’ यांनी लावलेली शिस्त, करवून घेतलेला कसून सराव, प्लानिंग आणि ध्येय याबाबतच्या महत्त्वाची गोष्टींचा उलगडा केला.

वयाच्या दहाव्या वर्षापासून मार्गदर्शन लाभतेय

वयाच्या दहाव्या वर्षापासून मला पुलेला गोपीचंद यांचे मार्गदर्शन लाभतेय. त्यांच्याकडून मला बॅडमिंटन खेळाचे बारकावे आत्मसात करता आले. याखेरीज शिस्त व मेहनत या दोन महत्त्वाच्या बाबीही त्यांच्याकडून शिकले. त्यांच्यामुळेच लहान वयामध्ये मला चांगले वळण लागले. याचा फायदा आता मला होत आहे असे पी. व्ही. सिंधू यावेळी आवर्जून म्हणाली.

खेळासोबत एज्युकेशनचेही धडे

पुलेला गोपीचंद यांच्याकडून बॅडमिंटन या खेळाचे धडे मिळत असले तरी त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणारे सर्व बॅडमिंटनपटू  अभ्यासावरही तेवढेच लक्ष देत आहोत. एज्युकेशनही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही ते आवर्जून सांगतात. मात्र बॅडमिंटनमध्ये करीयर करावयाचे असल्यामुळे या खेळालाच माझे पहिले प्राधान्य आहे, असे पी. व्ही. सिंधूने म्हणते.

आता वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी कसून सराव

पुलेला गोपीचंद यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मला रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावता आले. अर्थात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. मात्र पुलेला गोपीचंद यांनी टप्प्याटप्प्याने होत असलेल्या प्रगतीवर लक्ष देण्यास सांगितले आहे. एकदम पुढचा विचार न करता एक एक मालिकांवर लक्ष केंद्रीत करावे. त्यानुसार आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी आता सर कसून सराव करवून घेत आहेत. सेशनप्रमाणे आमचा दैनंदिन सराव असतो. सकाळ, संध्याकाळ अशा दोन सत्रांत आम्ही कोर्टवर असतो. तसेच खाण्यापिण्यावरही बंधन असतात, असे पी. व्ही. सिंधू पुढे म्हणाली.

प्रशिक्षक असावा तर गोपीचंद सरांसारखा

प्रशिक्षक कसा असावा याची व्याख्या जर मला विचाराल तर मी सांगेन, पुलेला गोपीचंद यांच्यासारखाच कोच असावा. आमच्या सरांचे ध्यान विचलित होत नाही. ते नेहमी ‘फोकस’ असतात. आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी लागणाऱया योजना त्यांच्याकडे रेडी असतात असे सांगणाऱया पी.  व्ही. सिंधू हिच्या देहबोलीतून पुलेला गोपीचंद यांच्याबद्दल असणारा आदर प्रकर्षाने दिसून येतो.

चुका तिथेच सांगतात

आम्ही सर्व खेळाडू नेटमध्ये किंवा प्रत्यक्षात सामन्यादरम्यान कोर्टवर खेळत असतो तेव्हा झालेल्या चुका गोपी सर तिथेच सांगतात. अपयशाने खचून न जाता पुढे नव्या जोमाने उभे राहण्याची शक्तीही त्यांच्याकडूनच आम्हाला मिळते असे पुढे सिंधू सांगते.

 

आपली प्रतिक्रिया द्या