जमिनीच्या भरवशावर सोयरीक केली; मात्र, वेकोलीमुळे सासुरवासाची पाळी आली

कोळसा खाणीत जमीन जाईल आणि त्या बदल्यात मोबदला तसंच नोकरी मिळेल या आशेवर जगणाऱ्या चंद्रपुरातील एका कुटुंबावर सासुरवासाची पाळी आली आहे.

ढवस कुटुंबाची 11 एकर जमीन होती. वेकोलीची कोळसा खाणीत जमीन जाणारच आणि मोबदल्यासह नोकरी देखील मिळणार या आशेने त्यांनी आपल्या मुलींचे लग्न लावून दिले. जावयाला आज ना उद्या नोकरी लागणार म्हणून ते निश्चिंत होते. मात्र, वेकोलीने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.

त्यांच्या जमिनीव्यतिरिक्त सभोवतालची सर्व जमीन त्यांनी अधिग्रहित केली, मात्र 11 एकर जमीन त्यांनी सोडली. आज चार वर्षे लोटूनही ही जमीन घ्यायला वेकोली तयार नाही. त्यामुळे ज्या मुलींचे लग्न लावून दिले त्यांच्या सासरकडून आता हेळसांड सुरू झाली आहे. वेकोलीच्या निगरगट्ट धोरणामुळे आज या महिलांना सासुरवास सहन करावा लागत असून, या त्रासामुळे त्यांना माहेर बसायची वेळ आली आहे. त्यामुळे या वेकोलीच्या विरोधात या महिलांनी साखळी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

वेकोलीच्या माजरी-कुचना खाणीच्या परिसरात नागलोन हे गाव आहे. कोळसा खाणीचे विस्तारीकरण होत असल्याने अनेकांच्या जमिनी यात गेल्या. त्याचा योग्य मोबदला तसेच त्यांना नोकऱ्यादेखील मिळाल्या. याच गावात 32 एकर शेती होती. त्यातील सर्व्हे क्रमांक 61 मधील 32 एकर पैकी मध्यभागी असलेली 11 एकर वडिलोपार्जित शेती ही जनार्दन ढवस, देवराव ढवस, नामदेव ढवस आणि विठ्ठल ढवस यांच्या वाट्याला आली. आपलीही शेती त्यात जाणार आणि नोकऱ्या मिळणार याबाबत सर्व निश्चिंत होते. ही नोकरी आपण आपल्या जावयाला देऊ याच आशेवर जनार्दन ढवस यांनी आपली मुलगी राखी हिचे लग्न राजकुमार ठाकरे याच्याशी लावून दिले. त्याचप्रमाणे दुसरा भाऊ देवराव ढवस यांनी आपली मुलगी नीता हिचे लग्न विनोद सोमलकर याच्याशी लावून दिले. तशी बोलणी देखील त्यांच्यात झाली होती. उरलेल्या दोन भावांनी आपले शेत रुपम धोटे आणि शुभम डोंगे यांना विकले. मात्र, वेकोली व्यवस्थापणाच्या मनात वेगळेच खलबत शिजत होते.

मध्यभागी असलेल्या या 11 एकर शेतीला सोडून वेकोलीने उर्वरित 21 एकर शेती अधिग्रहित केली. यामुळे सर्वांना धक्काच बसला. मात्र, वेकोलीने हात झटकले. ही शेती तुमची नाही यावर आपला कुठलाही अधिकार नाही असे म्हणत त्यांनी सर्व मागण्या फेटाळून लावल्या. जेव्हा की या क्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी शेतीची पाहणी करून ही जमीन त्यांचीच असल्याचा शेरा दिला आहे. मात्र, वेकोलीचे मुजोर व्यवस्थापन प्रशासनाला देखील जुमानले नाही. 2017 पासून हा संघर्ष सुरू आहे. ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल म्हणून लग्न केले. त्यांनी आपल्या पत्नीला जाब विचारायला सुरुवात केली. आपल्या सासऱ्याल देखील त्यांनी आपल्या नोकरीच्या कराराचे काय झाले असं विचारायचा तगादा लावला. या मुलींच्या सासरकडून देखील त्रास देण्यास येत आहे. या जाचापासून कंटाळून या मुलींना आपल्या माहेरी राहण्याची वेळ आली आहे.

शेतीचीही कोंडी

2017 पासून हे प्रकरण सुरू आहे. मात्र, वेकोलीने उलट या शेतकऱ्यांवर सूड उगवायला सुरुवात केली आहे. या शेतीच्या सभोवताली वेकोलीने उपसा केलेले सर्व मातीचे ढिगारे येथे उभारण्यात आले. शेतीकडे जाणारा रस्ता खोदून टाकला, पांदणरस्ता बंद केला. त्यामुळे आजवर जे शेतीतून उत्पादन मिळत होते. ते देखील बंद होण्याची वेळ आली आहे. याविरोधात शेतीधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शिवसेनेने केला पाठपुरावा

ह्या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम शिवसेनाप्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी वेकोली खाणीचे व्यवस्थापक यांची भेट घेतली. त्यावर तोडगा न निघाल्याने ते नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयात धडकले.

आपली प्रतिक्रिया द्या