विमानतळावर 24 कोटींचे कोकेन जप्त, हवाई गुप्तचर विभागाची कारवाई

18

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोकेनची तस्करी करणाऱ्या ब्राझीलच्या नागरिकाला सोमवारी हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. रॉड्रिगो अल्वेस असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 24 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. यंदाच्या वर्षातील ‘एआययू’ची ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

सोमवारी पहाटे ‘एआययू’च्या डी बॅचचे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गस्त घालत होते तेव्हा रॉड्रिगो हा इथोपियन एअरलाइन्सने आला होता. त्याच्या हालचाली एआययूच्या अधिकाऱ्यांना संशयित वाटल्या. त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडून 4105 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. रॉड्रिगोने ‘एआययू’च्या अधिकाऱ्यांना चकवा देण्याकरिता कोकेन पाऊचमध्ये लपवून ते पाऊच शरीरावर टेपने चिटकवले. त्यावर त्याने शर्ट घातले जेणेकरून ‘एआययू’च्या अधिकाऱ्यांना संशय येणार नाही असे त्याला वाटले होते.

रॉड्रिगोच्या विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तो कोकेन कोणाला देणार होता याचा तपास ‘एआययू’चे अधिकारी करत आहेत. रॉड्रिगो हा मूळचा ब्राझील चा रहिवासी असून तो पहिल्यांदाच हिंदुस्थानात विमानाने आला होता. कोकेनच्या तस्करीप्रकरणी त्याला काही रक्कम मिळणार होती. त्या रकमेकरिता त्याने कोकेनची तस्करी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या