धक्कादायक.. नारळपाणी विक्रेत्याने छाटली ग्राहकाची बोटे, डोंबिवलीच्या एमआयडीसीतील घटना

नारळपाणी पिण्यासाठी आलेल्या ग्राहकाची विक्रेत्याशी किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान थेट भांडणात झाले आणि नारळपाणी विक्रेत्याने ग्राहकाची कोयत्याने थेट बोटेच छाटली. ही घटना एमआयडीसी परिसरातील एम्स हॉस्पिटलजवळ घडली. जखमी ग्राहकाची एक करंगळी पूर्णपणे तुटली असून तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोर नारळपाणी विक्रेता फरार आहे.

दयानंद जतन हे मिलापनगर येथे राहतात. ते एमआयडीसीतील एम्स हॉस्पिटलजवळ नारळपाणी घेण्यासाठी गेले. काही नारळ सुकलेले होते म्हणून दयानंद यांनी ‘तू सुकलेले आणि खराब नारळ का विकतो’ असा प्रश्न विचारला. त्यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यावेळी संतापलेल्या नारळपाणी विक्रेता सलीम याने नारळ कापण्याच्या कोयत्याने दयानंद यांच्या डाव्या हातावर वार केला.