गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अनंतनाग येथे दहशतवाद्यांचा मुकाबला करताना देशासाठी बलिदान करणारे कर्नल मनप्रीत सिंग यांना शांतता काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कीर्तिचक्र आज मरणोत्तर जाहीर करण्यात आले आहे.
लष्करी अधिकारी आणि जवानांना त्यांच्या शौर्य आणि हौतात्म्यासाठी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार दिले जातात. रायफलमन रवी कुमार (मरणोत्तर), मेजर मल्लारामा गोपाल नायडू, जम्मू कश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हिमायुं मुज्जमील भट (मरणोत्तर) यांनाही कीर्तिचक्र जाहीर करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी एकूण 1037 शौर्य पुरस्कार आज मंजूर केले. यात चार कीर्तिचक्र, 18 शौर्यचक्र (चार मरणोत्तर सन्मान), एक सेना पदक फित, 63 सेना पदके, 11 नौसेना पदके आणि 6 वायू सेना पदकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील मानकरी
महाराष्ट्रातील सीआरपीएफचे अधिकारी राजेश पांचाळ, लखवीर आणि मलकित सिंग यांना शौर्यचक्र सन्मान जाहीर झाला आहे. अक्षय अरुण महाले, विंग कमांडर; आनंद विनायक आगाशे, विंग कमांडर यांना वायू सेना शौर्य पदक जाहीर झाले आहे.
शौर्यचक्र म्हणजे काय?
शौर्यचक्र लष्कर, नौदल आणि हवाई दल, कोणतेही राखीव दल, प्रादेशिक सेना आणि इतर कोणत्याही सशस्त्र दलाच्या सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांना दिले जाते. शौर्यचक्रात एक पदक दिले जाते आणि 1500 रुपये आर्थिक भत्ता म्हणून दिला जातो.
सीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके
केंद्रीय राखीव पोलीस दलाला सर्वाधिक 52 पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली आहेत. एकूण पदकांपैकी, 25 पदके जम्मू आणि कश्मीरमधील कारवाईसाठी प्रदान करण्यात आली आहेत तर 27 पदके ही अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित राज्यांमधील माओवादी विरोधी ऑपरेशन्ससाठी आहेत.
जम्मू आणि कश्मीर पोलिसांना 31 शौर्य पदके मिळाली आहेत तर प्रत्येकी 17 उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली आहेत.
दिल्ली पोलीस सहआयुक्त आत्माराम वासुदेव देशपांडे यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे.