गारवा

106

>>शेफ मिलिंद सोवनी

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी पेये घ्यायचं म्हटलं तर आपल्यासमोर सोलकढी, कोकम सरबत, लिंबू सरबत डोळ्यांपुढे उभी राहातात. पण त्यापेक्षा वेगळं काय करता येईल असा विचार करताना मला काही नावं आठवली. म्हणून मग मी त्या रेसिपीज दिल्या आहेत. यातल्या एका रेसिपीत आंब्याचं पन्हं घेऊन त्याचं फ्युजन केलंय. दुसऱयात सोलकढीतही फ्युजन केलंय आणि तिसरी म्हणजे खस मॉकटेल बनवलंय.

उन्हाळ्यात कृत्रिम पेय म्हणजे कोला, मिरांडा, थम्सअप वगैरे पिण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या बनविलेली पेये प्यावीत. मग फळे, काकडी, गाजर, टोमॅटो अशा नैसर्गिक भाज्यांपासून रस काढून ती प्यायची. कारण ते आरोग्यदायीही असते. मग त्याच्या जोडीला कैरीचं पन्ह, कोकमाचं सार, सिरप वापरावीत. सॉफ्ट ड्रिंक हानिकारक असतात. बाजारात खसचं सिरप, कोकमाचं कॉन्सन्ट्रेड मिळतं हे खरं, पण त्यातही आपण काहीतरी नवीन निर्मिती केली तर मजा येते. म्हणजे सरबतामध्ये पुदिन्याची काही पानं कुटून घालून पाहिली तर वेगळी चव येईल. बाजारात पल्प, कॉन्सन्ट्रेट मिळतं, पण त्यातून आपण आपलं काहीतरी पेय कसं तयार करतो यावर भर द्यावा.

कैरी-कोकमाचं पन्हं

साहित्य..३० मि.ली. कोकम सिरप, ३०  मि.ली. कैरीचं पन्ह सिरप, १२० मि.ली. सेव्हन अप किंवा कोणतंही लेमन ड्रिंक, काळीमिरीची पाव चमचा पूड.

कृती.. सर्वप्रथम फॅन्सी ग्लास घेऊन त्यात दोन्ही सिरप एकत्र करायची. मग त्यावर थंडगार सेव्हनअप घालून चांगले ढवळायचे. हे झाले कैरी अन् कोकमाचं पन्ह… ते मार्टिनी ग्लासमध्ये सर्व्ह करा. ते करताना त्यावर काळीमिरीची पूड भुरभुरवायची. हे पन्ह आणखी थंड हवं असेल तर त्यात बर्फाचे तुकडे घालता येतील.

क्रॅनबेरीने सजवलेली सोलकढी

साहित्य.. क्रॅनबेरी ज्यूस ६० मि.ली., तीन-चार कोकमांची पेस्ट (पाण्यात भिजवून त्याचा रस काढलेला असेल तरी चालेल), एक हिरवी मिरची कापलेली, आलं-लसणाची पेस्ट अर्धा चमचा, नारळाचं दूध ६० मि.ली., सजावटीसाठी पुदिन्याची पाने, मीठ चवीपुरते.

कृती..हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं-लसणाची पेस्ट आणि कोकम पेस्ट एका भांडय़ात घेऊन त्यात नारळाचं दूध टाकायचं. मग त्यात अगदी थोडं चवीपुरतं मीठ घालून मिश्रण ढवळायचं. त्यात सोलकढी घालून वर क्रॅनबेरी ज्यूसही घालायचा. मिश्रण एकजीव करून सर्व्ह करायचे.

आपली प्रतिक्रिया द्या