धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता लकी लॉटरीसाठी पैसे जमा केले, मानवाधिकार जर्नालिस्ट असोसिएशनचे अरबाज बडे यांची पोलिसांत तक्रार

धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता गणेशोत्सवादरम्यान लकी लॉटरीसाठी पैसे जमा करून विजेत्यांना बक्षिसे वाटल्याप्रकरणी मनसेचे जिल्हा सरचिटणीस आणि राज-वैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मानवाधिकार जर्नालिस्ट या असोसिएशनचे युवा जिल्हा अध्यक्ष अरबाज असगर बडे यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज-वैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी खेड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान भाविकांसाठी लकी ड्रॉ काढण्याची परंपरा असून नशीबवान भाविकांना, दुचाकी, फ्रिज, यासारखी पारितोषिके दिले जातात. गेली अनेक वर्षे लकी ड्रॉचा खेळ सुरू आहे. मनसे आणि राजवैभव प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला भाविकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे मनसे आणि राज-वैभव प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीदेखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परंपरेनुसार लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या लकी ड्रॉचा निकाल जाहीर झाला आणि ठरल्याप्रमाणे नशीबवान स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.

पोलिसात तक्रार दाखल करणारे अरबाज बडे यांनी या संपूर्ण स्पर्धेवरच आक्षेप घेतला असून यासाठी जो खर्च करण्यात आला तो खेड शहरातील व्यापाऱ्यांची दिशाभूल करून जमा केला असल्याचा आरोप बडे यांनी केला आहे. बडे यांनी खेड पोलिसात जी तक्रार दिली आहे त्यात म्हटले आहे. की, अशा प्रकारची लॉटरी काढण्यासाठी संबधित संस्थेने किंवा मंडळाने धर्मादाय आयुक्तांची किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या परवानगीनंतरच लॉटरीसाठी पैसे जमा करता येतात आणि त्या पैशातून पारितोषिकांचे वाटप केले जाते, मात्र मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता या लकी ड्रॉ लॉटरीची तिकिटे छापली. 100 रुपये प्रति तिकीट याप्रमाणे त्या तिकिटांचे वितरण केले शिवाय खेड शहरातील व्यापाऱ्यांकडून राज-वैभव प्रतिष्ठानच्या पावत्या देऊन देणग्या जमा केल्या. राज-वैभव प्रतिष्ठानच्या वतीने स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी गैरमार्गाने लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अरबाज असगर बडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीची दखल घेत खेड पोलिसांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 34 महाराष्ट्र लॉटरी (नियंत्रण व कर आकारणी) आणि बक्षीस स्पर्धा (कर आकारणी) अधिनियम 1958 4 (1) (a ) (b ) (c ) (d ) (1) (2) (3) लॉटरी नियमन अधिनियम 1998 7 (3) अनव्ये गुन्हा दाखल केला. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.