विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत आचारसंहिता सुरू झाली असून, निवडणूक यंत्रणा गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज असून, लोकसभेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीतही राज्यात आघाडीवर राहील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यामध्ये 16 लाख 56 हजार 274 पुरुष, 16 लाख 18 हजार 101 स्त्री, 183 तृथीयपंथी, 8 हजार 636 सैनिक, 27 हजार 120 दिव्यांग मतदार तसेच 18 ते 19 वयोगटातील 72 हजार 566 आणि 85 व त्यापुढील वयोगटातील 38 हजार 349 मतदारांची संख्या आहे. नवीन मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर एकूण 3 हजार 450 मतदान केंद्रे आहेत. 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये 1 सहाय्यकारी मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक 206 अ) प्रस्तावित असून, सदर केद्रांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. उर्वरित मतदारसंघात सद्य:स्थितीत एकही सहाय्यकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव नाही. यापैकी 1 हजार 726 केंद्रांवर मतदानादिवशी वेबकास्टिंग करून, कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण 30 आदर्श मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यामध्ये सर्व महिला मतदान केंद्रे (पिंक)-10, युवक मतदान केंद्रे 10, दिव्यांग मतदान केंद्रे 10 असणार आहेत.
जिल्ह्यात एकूण 7659 बॅलेट युनिट, 4209 सीयू आणि 458 व्हीपॅट मशिन्स उपलब्ध आहेत. तसेच 23 नोडल अधिकारी, 452 क्षेत्रीय अधिकारी, 3450 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच इतर अधिकारी असे 19 हजार 865 मनुष्यबळ उपलब्ध आहे. उमेदवारांचे अर्ज 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत सादर करावयाची आहेत. यात शासकीय सुट्टी दिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
गुन्हेगारांवर दहा दिवसांत कारवाई करणार – पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित
सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सन 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आचारसंहिता भंग करणार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांत अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्ह्यातील, सामाजिक तेढ निर्माण करणारे आदी विविध गुन्ह्यांशी संबंधितांची यादी तयार करण्यात आली आहे. कारागृहातून बाहेर आलेल्या 530 जणांसह हद्दपारीच्या प्रस्तावात नावे असलेल्यांवरही दहा दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.
वृद्ध आणि दिव्यांगासाठी घरीच मतदानाची सोय
लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जे मतदान केंद्रात जाऊ शकत नाहीत अशा 80 ते 85 वयोगटावरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी घरात मतदान करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी 22 ते 27 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म-डी संबंधितांकडून भरून पूर्ण करण्यात येणार असल्याचे अमोल येडगे यांनी सांगितले.