मुंबईकरांनो विनाकारण रत्नागिरीत येऊ नका! जिल्हाधिकाऱयांचे आवाहन

गेल्या दोन दिवसात जिह्यात 939 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहीले तर ती चिंताजनक गोष्ट ठरली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे मुंबईतून चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत कारण नसेल तर मुंबईकरांनी गावाला येऊ नये असे कळकळीचे आवाहन केले आहे.

रेल्वेने येणाऱया प्रवाशांची स्थानकातच कोरोना चाचणी

कोकण रेल्वेने जिल्हय़ात येणाऱया प्रवाशांची कोरोना चाचणी रत्नागिरी रेल्वेस्थानकातच करण्यात येणार आहे. त्याकरीता 30 कर्मचाऱयांचे एक पथक रेल्वेस्थानकावर तैनात ठेवण्यात येणार आहे. हे पथक 24 तास कार्यरत राहणार असून तपासणीनंतर जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडतील त्यांना कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे. आणि उर्वरित प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध

जिह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने प्रशासनाने आता लॉकडाऊनचे नियम अधिकच कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध आले असून दुकाने बंद ठेवून त्यांना केवळ होम डिलीव्हरीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱयांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या