सोन्याची नाणी, तोफा अन् 14,400 कोटींचा खजिना; 300 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले जहाज सापडले

कोलंबियामध्ये 300 वर्षांपूर्वी समुद्रामध्ये बुडालेले एक जहाज सापडले आहे. नौदलाने हे जहाज शोधून काढले आहे. कॅरेबियन समुद्रामध्ये नौदलाने दोन जहाजांचे अवशेष शोधले असून यासोबत हजारो कोटींचा खजिना देखील सापडला आहे. कोलंबिया सरकारने याबाबत एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे.

कॅरेबियन समुद्रामध्ये कोलंबियाच्या नौदलाने दोन जहाजांचे अवशेष शोधून काढले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून ही जहाजे समुद्राच्या तळाशी होती. समुद्रात 3100 फुटांवर या जहाजांचे अवशेष सापडले आहेत. ‘सॅन जोस गॅलीयन’ नावाचे हे अवशेष असून 300 वर्षांपूर्वी ते समुद्रामध्ये बुडाले होते.

‘सॅन जोस गॅलीयन’ हे जहान 1708 मध्ये कोलंबियाच्या कॅरेबियाई बंदराजवळील कार्टाजेनाजवळ बुडाले होते. 2015 मध्ये नौदलाला हे जहाज सर्वात आधी आढळून आले होते. तेव्हापासून शोधकार्य सुरुत होते. काही दिवसांपूर्वीच आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या अवशेषांची जवळून पाहणी करण्यात आली असा येथे हजारो कोटींचा खजिना असल्याचे दिसून आले. सोन्याची नाणी, दागिने, तोफा, चिनी वस्तू नौदलाला येथून आढळून आल्या.

14 हजार कोटींची खजिना

हे जहाज कसे बुडाले याबाबत इतिहासकारांनी माहिती दिली आहे. 1708 मध्ये हे जहान कॅरबियन समुद्रामध्ये बुडाले होते. स्पेन आपल्या देशातील मौल्यवान खजिना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असताना इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. 8 जून 1708 मध्ये इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यात हे जहाज बुडाले होते. जहाज बुडाले त्यावेळी त्यावर 600 लोक होते. यातील फक्त 11 जणांचाच जीव वाचू शकला. खजिन्यासह शेकडो लोक समुद्रामध्ये बुडाले होते.

स्पेनचा दावा

दरम्यान, हा खजिना 2015 मध्येच शोधण्यात आला होता. टायटानिकचा शोध लावणाऱ्या संस्थेनेच ‘सॅन जोस गॅलीयन’ जहाज शोधून काढले होते. मात्र कॅरेबियन समुद्रामध्ये सापडलेल्या या खजिन्याच्या मालकी हक्कावरून कोलंबिया आणि स्पेनने दावा केला होता. स्पेनने हे जहाज आपले असल्याने खजिना आपला असल्याचे, तर कोलंबिना हा खजिना आमच्या भागात सापडल्याने तो आमचा असल्याचे म्हटले.