कोहलीच्या डोक्याला ताप, विजयानंतरही दुसऱ्या कसोटीत सलामीला कोण?

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लंकेविरुद्ध गॉल कसोटीत सलामीवीर शिखर धवनने पहिल्या डावात १९० धावांची दमदार खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात अभिनव मुकुंदने ८१ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे हिंदुस्थानला लंकेवर मोठा विजय मिळवता आला होता. सलामीवीरांची कामगिरी चांगली झाली असली तरी यामुळे विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघातील सलामीवीर मुरली विजय जायबंदी झाल्याने धवनला संधी देण्यात आली होती. तर दुसरा सलामीवीर केएल राहुलला सामन्यापूर्वी ताप आल्याने मुकुंदची वर्णी लागली होती. दरम्यान, दुसऱ्या कसोटीपूर्वी राहुल बरा होण्याची शक्यता असल्याने कोहलीची चिंता वाढली आहे.

केएल राहुल हिंदुस्थानचा नियमित सलामीवीर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत राहुलने जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र लंकेविरोधात पहिल्या कसोटीत धवन आणि मुकुंदने चांगली कामगिरी केल्याने दुसऱ्या कसोटीसाठी धवन-मुकुंद की धवन-राहुल ही जोडी निवड करण्याचा मोठा पेच कोहलीपुढे असणार आहे.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने पहिली कसोटी ३०४ धावांनी दणदणीत जिंकत मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या