चेंबूरमधील कलरचे दुकान साफ करून आरोपी राजस्थानात सटकले; आयडिया केली, मेहनत घेतली तरीही लटकले

बनावट चावीच्या सहाय्याने चौघांनी मिळून चेंबूर येथील एका रंगाच्या दुकानात मोठा हात मारला. रातोरात दुकानातील नऊ लाखांचे रंग टेम्पोत भरून चोरून नेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढवल्या चोरीचा मुद्देमाल शिताफीने कुर्ल्यात लपवून राजस्थान गाठले. पण एवढी कसरत करूनही ते टिळकनगर पोलिसांच्या हाती लागले.

महेंद्रकुमार जैन यांच्या मालकीचे चेंबूर परिसरात नाकोडा पेंट्स ट्रेडर्स नावाने रंग विक्रीचे दुकान आहे. दुकानाला लागूनच दोन गोदामे आहेत. 17 तारखेच्या रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले. पण 18 तारखेला त्यांनी दुकान उघडले असता दुकानातील मोठय़ा प्रमाणात रंगाचे मोठे डबे चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल वाघमारे व पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच रंगकाम करणाऱ्यांकडे तपास सुरू केला. तेव्हा आरोपी हे राजस्थाननातील मसाला गँगचे पंटर असून ते राजस्थानात आश्रयाला गेल्याचे निष्पन्न झाले.  त्यानुसार वाघमारे आपल्या पथकासह राजस्थानात धडकले. मग तेथील खमनोर पोलिसांची मदत घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.

घनदाट जंगलात चोर-पोलीस पाठलाग

आरोपींच्या राहत्या घराचा शोध घेऊन त्या परिसरात पोलिसांनी साध्या वेशात सापळा लावला. बराच वेळ दबा धरून बसल्यानंतर सायंकाळी थोडासा अंधार पडताच  आरोपी हे एका झोपडीवजा घराच्या बाजूला येऊन थांबले. ही माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेण्याकरिता पोलीस पथक गेले असता ते पोलीसांना पाहून बाजुला असलेल्या जंगलात धुम ठोकली. मग चोर पुढे पोलीस मागे असा पाठलाग जंगलात सुरू झाला. अगदी फिल्मी पद्धतीने आरोपींना धाक दाखवत अखेर गोपाळसिंह परमार (21) आणि भैरूसिंह परमार (27) या दोघांवर झडप घालण्यात आली. चौकशीत त्यांनी कुर्ल्याच्या सुभाषनगर येथील एका चाळीतल्या खोलीत चोरीचा मुद्देमाल लपविल्याचे सांगितले. मग ती खोली गाठून पोलिसांनी तेथे लपविलेले वेगवेगळ्या किमतीचे कलरचे एकूण 170 डबे हस्तगत केले.