जेव्हा डोळय़ाच्या कडा पाणावतात

>> द्वारकानाथ संझगिरी

तळकोकणाच्या एका फेरीत कितीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

कोकणाने महाराष्ट्राला केवढी मोठमोठी माणसं दिली. (याचा अर्थ महाराष्ट्राचे इतर भाग हे महान व्यक्तिमत्त्वं पुरवण्याच्या बाबतीत शुष्क आणि वैराण होते असं नाही. कृपया गैरसमज करू नये) एकेकाळच्या कोकणाच्या अठराविश्वे दारिद्रय़ातून नररत्नं जन्माला आली.

मी मालवणच्या रॉक गार्डनच्या बाहेर नारळपाणी शोधत होतो. एका तरुणाने मला विचारलं, ‘तुम्ही द्वारकानाथ संझगिरी ना.’

मी म्हटले, ‘हो’. मग चॅनेल, लिखाण यावर गप्पा झाल्यावर तो म्हणाला, ‘पांडुरंग साळगावकर इथला. तुम्हाला कल्पना आहे ना?’

मी म्हटलं, ‘हो, कोल्हापूरला जायच्या आधी तो इथेच शाळा-कॉलेजात होता ना?’

तो म्हणाला, ‘तुम्ही देवबागला ज्या हॉटेलात उतरला आहात तिथून हाकेच्या अंतरावर त्याचं घर आहे. त्यावेळी मालवण – देवबाग रस्ता नव्हता. तो रोज देवबागहून समुद्राच्या रेतीतून वाटा तुडवत दहा मैल लांब कॉलेजला यायचा आणि परत जायचा.’

मी म्हटलं, ‘म्हणून तो वेगवान गोलंदाज होऊ शकला’. मला राहवेना. मी थेट पांडुरंगला फोन लावला. त्याने त्याचा दिनक्रम माझ्यासमोर ठेवला. त्यावेळी तो रोज पंचवीस बांगडे घ्यायचा. (मालवणमधून बांगडे कमी व्हायच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण सांगितलं जातं.) वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज, त्यांचे तुफानी फलंदाज समुद्राच्या वाळूत खेळून, लाटा अंगावर घेऊन मोठे झाले. कोकणातून आपल्याला चांगले क्रिकेटपटू मिळू शकले असते. क्रिकेटपटूंना लागणारी मेहनत हा त्यांच्या रोजची पोटाची खळगी भरण्याचा भाग होता. ‘कर’ आडनावाच्या गावसकर, वेंगसरकर, सोलकर, तेंडुलकर वगैरेचं कौटुंबिक मूळ कोकणच आहे. कोकणाने मुंबई महाराष्ट्राला केवढे क्रिकेटपटू दिले. मालवणचे नगराध्यक्ष कांदळगावकरांनी मालवणात आता झालेले सुंदर क्रिकेटचं मैदान मला दाखवलं. आता कोकणात क्रिकेट फुलतंय. यापुढे पुन्हा ‘कर’ आडनावाचे क्रिकेटपटू हिंदुस्थानी संघात दिसायला लागतील. सचिनच्या क्रिकेटचा पाया बळकट होत असताना आचऱयातले ‘आचरेकर सर’ सचिनला सामन्याच्या सरावासाठी सावंतवाडीला घेऊन जात.

ज्या ‘देवबाग’च्या आलिशान हॉटेलमध्ये मी होतो ते देवबाग अगदी काही वर्षांपूर्वी केवढं मोठं असेल! १९७० साली पांडुरंग साळगावकरला १० मैल वाळूतून चालत यावं लागलं होते. म्हणजे त्यापूर्वी काय असेल पहा! ते गाव एका अंगावर अरबी समुद्र झेलतं तर दुसऱया बाजूला खाडीत पाय सोडून आहे. आता ते गाव वॉटर स्पोर्टस्ने गजबजते. त्यावेळी एक खेडं होतं. त्या खेडय़ात एक कामत नावाचे गृहस्थ होते. शाळेत शिकवत. असून असून किती मोठी शाळा असणार तिथे? प्रायमरी शाळा असावी. त्यांच्या मुलावर त्या छोटय़ा गावात शिक्षणाचे संस्कार त्याच्या वडिलांनीच केले. काय अपेक्षा असू शकते? एका शाळा मास्तराने आपल्या मुलाकडून शिकावं, मोठं व्हावं. या छोटय़ा डबक्यातून फार तर मोठय़ा तळय़ात जावं. तो मुलगा थेट समुद्रात उतरला. त्याने लहान महत्त्वाकांक्षा ठेवलीच नाही. तो ब्रिटिश जमान्यात विलायतेला जाऊन आयसीएस झाला. मग तो लाईफ इन्शुरन्स कंपनीचा (LIC) चेअरमन झाला. कोकणात अशा कथा बऱयाच ऐकायला मिळतात.

त्या देवबागवरून कुणकेश्वराच्या शिवमंदिरात जाताना मला आचरा, चिंदर, मुणगे, वायंगणी वगैरे गावं लागली. कोकणात गावच्या नावाला ‘कर’ जोडला की आडनाव तयार होतं. माझ्या डोळय़ासमोर आचरेकर, चिंदरकर, मुणगेकर, वायंगणकर वगैरे मित्र आले. काय मजा आहे! इतकी सुंदर गाव आहेत त्यांना! याचा मला हेवाही वाटला. तेवढय़ात आणखी एक गाव डोळय़ासमोरून गेले ‘कांदळगाव’. मला माझे मित्र टोरांटोचे कांदळगावकर आठवले. ते मुंबईत नुकतेच आलेले होते. मी त्यांना फोन केला. फोन ताईने (सौ. कांदळगावकर, पूर्वाश्रमीची भागवत) उचलला. ताई म्हणाली, ‘‘नारायणराव झोपलेत. जेटलॅगचा त्रास झालाय. उठल्यावर फोन करायला सांगते.’’ ते उठल्यावर त्यांनी फोन केला. नुसत्या गावाच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला होता.

खरं सांगायचं तर नारायणराव कांदळगावकरांना नुसत्या गावच्या आठवणीने कंठ दाटून येण्याएवढा त्या आठवणी गोड नव्हत्याच. त्यांचा जन्म तारकर्लीचा. म्हणजे कांदळगावच्या जवळच. त्यांची जात दलित. नवऱयाने टाकलेल्या, एका जातपात ज्ञात नसलेल्या बाईच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी तिला ठेवून घेतली. कारण लग्नाच्या बायकोला मूल नव्हते. नारायणराव फक्त सहा दिवसांचे असताना ती बाळंतपणानंतर रक्तस्रावाने गेली. चिडलेल्या नातेवाईकांनी म्हटलं, ‘हिला कुत्र्यामांजरीला खायला घाला. हिच्यावर कसलं मरणोत्तर क्रियाक्रम करायचं’. तरीही त्यांच्या वडिलांनी चार मित्र जमवून तिला स्मशानात नेऊन अंत्यसंस्कार केले. नारायणरावांकडील आई आणि आईकडचे नातेवाईक वयाच्या सहाव्या दिवशीच संपले.

वडील खलाशी, म्हणजे उद्योग मासेमारी आणि जहाजातून माल कराची, कोचिनला नेणं. मासेमारी, खलाशाचं काम करता करता त्यांचं शिक्षण झालं कारण अमेरिकन मिशनरीने त्यांना आपलं म्हटलं. ‘आपलं’ म्हणताना नेहमीच्या समजुतीप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर आपला धर्म लादला नाही. त्यांची बुद्धिमत्ता अफाट होती. इंग्लिश मुख्य भाषा बनली. तरी संस्कृत वाचलं की पाठ व्हायचं. तीच गोष्ट मराठी कवितेची. परवाच वयाच्या ८५ वर्षी त्यांनी मला बोरकर, मंगेश पाडगावकर, कवी यशवंत तांबे यांच्या कविता काल पाठ केल्याप्रमाणे ऐकवल्या. मुंबईत आल्यावर आधी ते वडिलांबरोबर लालबागची रंगारी बदक चाळ आणि मग दादरच्या बिस्मिला बिल्डिंगमध्ये राहिले. रात्रशाळेत जायचं, सकाळी धुणीभांडी, झाडूपोचा ‘सुसंस्कृत’ लोकांच्या घरात करायचा हा त्यांचा दिनक्रम! तरी १९९४ साली मॅट्रिकमध्ये संस्कृतमध्ये शंभरात शंभर आणि गणितात दोनशे पैकी दोनशे गुण मिळवले. मात्र तरीही कपाळावरचा जातीचा शिक्का पुसला गेला नाही. पुढे इंटरमध्ये पहिला वर्ग, सेंट झेवियर्स कॉलेजची फेलोशिप करत ते ‘ऍक्चुअरी’ झाले. स्टॅटिस्टिक्स आणि गणितातली सर्वोच्च डिग्री. इन्शुरन्स कंपनीत असे मूठभर ऍक्चुअरी असतात. नंतर त्यांनी जागतिक स्तरावरची परीक्षा दिली. जगभरातून १३२ जण परीक्षेला बसले होते. त्यात दोनच पास झाले. एक नारायणराव दुसरा एक पाकिस्तानी. मग त्या जोरावर ते कॅनडात गेले आणि तिथेच मस्त सुखवस्तू आयुष्य काढू शकले.

कहाणी इथे संपत नाही. त्यांची मुलगी गौरी तिथल्या पॉश पब्लिक शाळेत शिकली. त्यानंतर ते तिला एकदा त्यांच्या वेंगुर्ल्याच्या शाळेत घेऊन गेले. साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट! ती शाळा पाहून अवाक झाली. महालातल्या माणसाला चाळीतल्या खोल्या कशा वाटणार? ती शाळेत शिरली. तिला एका हॉलमध्ये तीन फळे दिसले. तिने तिथल्या मुख्याध्यापकांना विचारले, ‘‘तीन फळे का?’ ते म्हणाले, ‘एकाच वेळी इथे तीन वर्ग भरतात.’ तिच्यासाठी तो सांस्कृतिक धक्का होता. तिने वडिलांना प्रश्न विचारला, ‘इथून शिकूनही तुम्ही इतके बुद्धिमान कसे?’ नारायणरावांनी तिला सांगितले, ‘बुद्धिमत्ता ही जात, पात, धर्म, जन्मस्थळ, शाळा-कॉलेज यावर अवलंबून नसते.’ मग ते तिला बंदरात घेऊन गेले. कुठून मासेमारीच्या बोटी आणत, कुठून बाहेर काढत ते दाखवलं. तिच्या डोळय़ातून अखंड अश्रू वाहत होते. कुठे तारकर्ली, कुठे टोरांटो! हे अंतर निव्वळ बुद्धीच्या विमानातून किती सहजपणे आपले वडील पार करू शकले याचा तिला अभिमान वाटला.

नारायणरावांनी एवढंच तिला सांगितले, ‘जगातल्या सर्वात महागडय़ा हॉटेलात मी राहिलो, जेवलो, भौतिक सुखाच्या गादीवर लोळलो, तरी तारकर्ली, वेंगुर्ला, कोकण हे माझं हेरिटेज आहे. तिथले कष्ट विसरले जातात, द्वेष विसरला जातो. जो उरतो तो लालमातीचा सुगंध आणि त्याला जोडली गेलेली ती नाळ, मी मरेपर्यंत ‘कोकणीच’ राहणार.’