हरवलेलं संगीत (भाग 6) : चुरा लिया तुने…

>>शिरीष कणेकर

ताजमहाल हॉटेलच्या लॉबीत ओ. पी. नय्यर व मी मचूळ चहा पीत गप्पा मारीत होतो. तो एकाएकी मला म्हणाला, ‘‘ये साले शंकर-जयकिशन! (‘साला’ हा शब्द ओ.पी.च्या बोलण्यात स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह… सगळं काही होता. तो पूर्णविराम मात्र कधीच नव्हता) ये साले शंकर-जयकिशन… इनको ना, कोई अजीब रेडियो स्टेशन मिला था. उत्तररात्री केव्हातरी ते लागायचं. हे पठ्ठे त्यावर गाणी ऐकत व नोटेशन उतरून घेत. झालं यांचं हिट गाणं तयार…’’

वरकरणी पाहिलं तर ओ.पी.चा आक्षेप या उचलेगिरीला होता, पण तसं नव्हतं. आपल्याला हे रेडियो स्टेशन माहीत नाही व सापडू नये ही ओ.पी.ची अव्यक्त तक्रार होती. सगळय़ांनी मिळून ‘सुरतेची वखार’ लुटावी असा ‘जिओ और जीने दो’ किंवा ‘चुराओ और चुराने दो’ असा त्याचा मानवतावादी दृष्टिकोन असावा. कल्याणजीकडे कोणी, कुठून, काय चोरलं यांचा चिठ्ठाकच्या होता. तो पेटी समोर ओढायचा आणि मूळ चाल व त्यावरून उचललेली (पक्षी ः चोरलेली) चाल तो वाजवून व गाऊन सप्रमाण दाखवायचा.

‘‘कल्याणजीभाई, तुम्ही चोरल्यात का कधी चाली?’’ मी एकदा विचारले.

‘‘अरे बापरे!’’ कल्याणजी कपाळावर हात मारून म्हणाला, ‘‘भरपूर. किती सांगू? किती सांगू?’’

यावर काही बोलणं मला शक्यच झालं नाही. याला कल्याणजीचं पारदर्शक, प्रामाणिक मन म्हणावं की कोडगेपणा म्हणावा हे आजही मला कळत नाही. मेहंदी हसनच्या एका गझलेवरून मदन मोहननं बेतलेलं गाणं मला ऐकवून ओ. पी. म्हणाला, ‘‘देखो, मदन जैसा आदमी भी ऐसा करता है.’’ म्हणजे ‘ऐसा’ करणं क्षम्य असलेल्यांची ओ.पी.कडे वेगळी यादी होती तर.

मदन मोहनच्या त्यावेळी गाजत असलेल्या ‘आखरी दांव’मधील रफीच्या ‘तुझे क्या सुनाऊ मैं दिलरूबा’चं सज्जादच्या ‘ये हवा ये रात ये चांदनी’ या ‘संगदिल’मधल्या तलतच्या गाण्याशी साम्य आढळल्यावर सज्जाद फिस्कारून मला म्हणाला होता, ‘‘आज कल बाजार में हमारी तर्जेही नहीं, उनकी परछाईया भी चलती है.’’

मदन मोहनची ‘अनपढ’मधील ‘आपकी नजरोंने समझा’ व ‘है इसी में प्यार की आबरू’ ही दोन गाणी ऐकून भावविवश होऊन नौशाद म्हणाला होता, ‘‘एवढी दोन गाणी मला द्या व त्या बदल्यात माझं अवघं संगीत घेऊन जा.’’

सगळा खेळ सात सुरांचा असल्यानं थोडं इकडं तिकडं होणं स्वाभाविक आहे. एकाच रागावर आधारित गाण्यांत साम्य स्थळं आढळणंही क्रमप्राप्त आहे. याला आपण उचलेगिरी, चोरी किंवा ढापाढापी म्हणू शकत नाही. ‘बदनाम मुहोब्बत कौन करे’ (‘दोस्त’ – सज्जाद-नूरजहान) या गाण्यातला ‘बदनाम’नंतरचा हिसका आवडून सी. रामचंद्रनी ‘मलमली तारुण्य माझे’मध्ये ‘मलमली’नंतर तसाच वापरला होता (ते तसं सांगतही). आता ही गंमत बघा. ‘गजरे’मध्ये अनिल विश्वासनं ‘घर यहाँ बसाने आये थे’ ही नितांत सुंदर ‘मेलडी’ लताला दिली. का कोण जाणे, ती कोणी ऐकलीच नाही. ‘घर यहां बसाने’चे अपयश अनिलदाला जरा जास्तच लागून राहिलं असावं. इतकी सुंदर चाल वाया जाऊ देणं अनिलदाच्या जिवावर आलं असावं. त्यानं तीच चाल थोडा फेरफार करून ‘तराना’मध्ये वापरली. लता-तलतचे हे अजरामर द्वंद्वगीत होतं – ‘सीने में सुलगते है अरमाँ’. लता व तलत यांच्या पाच सर्वोत्कृष्ट द्वंद्वगीतांत ‘सीने में सुलगते’ माझ्या मते अग्रणी ठरेल. इतर चार द्वंद्वगीते असतील – ‘मत छेड जिंदगी के… दिले बेकरार सोजा’ (‘रागरंग’ – रोशन), ‘दिल मे समा गये सजन’ (‘संगदिल’ – सज्जाद), ‘अपनी कहो या मेरी सुनो’ (‘परछाई’- सी. रामचंद्र), ‘इक बेवफा को दिल का सहारा’(‘अजीब लडकी’ – गुलाम अहमद).

‘मॅन हू न्यू टू मच’मधलं डोरिस डेचं ‘के सरा सरा’ त्या काळी विलक्षण गाजलं होतं. अनिलदाही त्यानं प्रभावित झाला असावा. त्यानं ‘के सरा सरा’ आपल्या शैलीत दिलं. चित्रपट ‘जासूस’, गाणं ‘जीवन है मधुबन’ (गायक तलत). दोन्ही गाणी पाठोपाठ ऐकूनही आपल्या कानांना ती नक्कल वाटत नाही हे अनिलदाचं रचना कौशल्य. स्वतःपाशी एवढं भरभरून असताना दुसऱयाची सरळ सरळ नक्कल करणारे हे संगीतकारच नव्हेत. माझा मित्र ओ. पी. नय्यर याने मात्र ‘मेरे सनम’मध्ये रफीचं ‘पुकारता चला हूँ मैं’ सरळ सरळ पार्श्वसंगीतासहित चोरलेलं आहे, हे मला कधीच सांगितलं नाही.

वर्षानुवर्षे अभ्यास करून रॉन गुडविन हा पाश्चात्त्य संगीतकार एक वाद्यवृंदाची एल.पी. बाजारात आणतो. आपले संगीतकार ती कुरतडतात व आपल्या नावावर ती धून खपवतात. ‘बाजे पायल छम छम’ (‘छलिया’ – कल्याणजी वीरजी शहा), ‘चाहे कोई खुश हो’ (‘टॅक्सी ड्रायव्हर’ – एस. डी. बर्मन) ही त्यातली आज आठवणारी काही उचललेली गाणी.

चोरलेल्या चाली गाजतात आणि ओरिजिनल गाजत नाहीत याला काय म्हणावं? ‘दिले नाशाद को जीने की हसरत’पेक्षा (‘चुनरिया’ – हंसराज बहेल) जास्त लोकप्रिय आहे ‘जमाने में अजी ऐसे कई नादान होते है’ (‘जीवनमृत्यू’ – लक्ष्मीकांत – प्यारेलाल). ‘हमी से मुहोब्बत हमी से लडाई’पेक्षा (‘लीडर’ नौशाद) जास्त लोकप्रिय आहे ‘ऐ फुलों की रानी’ (‘आरजू’ – शंकर-जयकिशन). ‘मेरे पास आओ, नजर तो मिलाओ’पेक्षा (‘संघर्ष’ – नौशाद) जास्त लोकप्रिय आहे ‘कामदेव जैसी तेरी मुरतिया’ (‘तुम हसी मै जवाँ’ – शंकर-जयकिशन).

गेल्या दहावीस वर्षांतली गाणी मी विचारात घेतलेली नाहीत. कारण माझी माहिती कमी पडते व मला चोरबाजारातून भटकल्यासारखं वाटतं. अनेक आधुनिक संगीतकारांना ‘ओरिजिनल’ चाल कशाशी खातात हेच माहीत नसतं. मैं चोर हूं, काम है चोरी.

इथं मी आवरतं घेतो. ‘आवारा हूं’ (‘आवारा’ – शंकर-जयकिशन), ‘मेहबूबा मेहबूबा’ (‘शोले’ – राहुल देव बर्मन) व तीन भागातली कव्वाली (‘बरसात की रात’ – रोशन) या सगळय़ा चाली थेट उचललेल्या आहेत हे कळल्यावर श्रद्धास्थानांना हादरा बसतो. अज्ञानातला आनंद चांगला म्हणतात तो असा. वसंत देसाईंनी ‘मौसी’मध्ये एक विडंबन गीत केलं होतं – ‘इधर से थोडा, उधर से थोडा, माल का जोडा, बनाया घोडा, टप टप टप टप…’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या