ट्रेनमधली मैत्री

66

>> शिरीष कणेकर

ट्रेन हे नवीन ओळखी व मैत्री होण्याचं ठिकाण आहे. काही लोक ते प्रवासाचे साधन आहे असं मानतात. काही लोक ट्रेनमध्ये तरुण, सुंदर पोरगी भेटली की तो देवानं आपल्याला दिलेला बोनस आहे असं मानतात. ती धुपवून गेली की बोनसचं पाकीट ट्रेनमध्ये मारलं गेल्यागत त्यांना वाईट वाटतं. भरलेल्या ट्रेनमध्ये मुलगी नेहमी समोरच का बसलेली असते व आपल्या शेजारी एका बाजूला जाड्या मारवाडी व दुसऱ्या बाजूला सरदारजी कसे येतात? नाही पोरगी नशिबात तर मुळात देव तिला डब्यात आणतोच कशाला? नसता मनस्ताप व देहपीडा!

अनेक प्रवाशांची अशी ठाम समजूत असते की, ट्रेन स्टेशनवर थांबते ती त्यांना काय काय खायला मिळावं म्हणूनच. मग गंडेरी खा, लाह्या खा, सँडविचेस खा, कलिंगडाचे काप खा. गाडी सुटते. कारण चालत्या गाडीत खाण्याच्या गोष्टी विकायला येणाऱयांची विक्री व्हावी म्हणून. कुठून कुठेही जाणारी ट्रेन हे खाण्याचे चालते, फिरते व थांबते उपाहारगृह असते. म्हणून काही माणसं हॉटेलात जातात त्याप्रमाणे काही माणसं ट्रेनमध्ये जातात.

मला कळत नाही तिकीट तपासनीस डब्यातील प्रत्येकाचं तिकीट का तपासतो? आम्ही काय विदाऊट तिकीट प्रवास करणारे वाटतो? चेहऱयावरून भले तसे वाटत असू, पण तसे आहोत का? स्वतंत्र देशातील करदात्या नागरिकांवर असा अविश्वास दाखवणं बरं दिसतं का? तुम्हीच असा अविश्वास दाखवलात तर परदेशातून आम्हाला बेवारशी कुत्र्यासारखी वागणूक मिळाली तर त्यात नवल काय! तरी बरं, कुत्तेकमीने असं आपल्याकडे संतशिरोमणी धर्मेंद्रजी यांनी (अनेकदा) म्हणून ठेवलंय. त्यातून कधी खरोखरच तिकीट नसलं तर तपासनीसाला चकवीत या डब्यातून त्या डब्यात धावणं किती जिकीरीचं होतं माहित्येय? एकदा तर मला संडासात लपावं लागलं होतं. भीतीमुळे मला गेल्यासरशी पुढलीही कृती करावी लागली होती. माझा मित्र प्रकाश जावडेकर रेल्वेमंत्री झाला की त्याला सर्वप्रथम तिकीट तपासनीस हे पदच नष्ट करायला सांगणार आहे. कशाला हवेत ते कटकटे? (माझी संडासात लपण्याची युक्ती ‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपटात माझी परवानगी न घेता खुशाल वापरली होती.)

साहित्यिक सआदत हसन मंटो याच्या पाठोपाठ माझ्या आयुष्यावर चित्रपट काढतील तेव्हा तरी मला विचारा म्हणावं. तो संडासात लपण्याचा प्रसंग कितीही खरा असला तरी त्याचा समावेश करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा ट्रेनच्या संडासात अडकून बसलेल्या व भेदरून रडणाऱया लहान मुलाला मी कसं शिताफीनं बाहेर काढलं, हा काल्पनिक किस्सा रंगवून दाखवा. संडासाचा क्लोज-अप, माझा क्लोज-अप, ट्रेन धाडधाड धाडधाड धावत्येय…

ट्रेनच्या प्रवासात मला समविचारी, समआचारी, समव्यसनी (म्हणजे स्वतःविषयी खऱयाखोटय़ा कहाण्या सांगून बडेजाव मिरवणाऱ्या) मंडळींची ओळख होते व साथ मिळते. शिवाय समोर बसलेल्या सुंदर मुलीच्या शेजारी ते बसलेले असल्यानं त्यांच्याशी बोलण्याच्या निमित्तानं शेजारी कटाक्ष टाकता येतो. त्यातून ती बोलकी निघाली तर तिच्या शेजाऱ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करता येतं. तिच्या जवळ बसायला मिळालं यात आपलं काहीतरी कर्तृत्व आहे अशा मिजाशीत साला बसलेला असतो. अन् मला सांगा, माझ्याशी बोलताना सारखं अंग मोकळं सोडायचं काय कारण? या लंपट पुरुषांची जात मी चांगली ओळखतो. बाई दिसली की पाघळले. माझ्यासारखे विरळा.

परपुरुष संभाषणाची तार छेडत. मला विचारतो –

‘‘काय नाव?’’

‘‘कणेकर.’’ मी नर्व्हसपणे पडेल आवाजात सांगतो. अख्खा महाराष्ट्र ज्याला ओळखतो त्याला हा सांड ओळखत नव्हता. चक्क मंगळूरहून आला असावा.

‘‘फायरब्रिगेडमध्ये आहात का?’’ त्यानं मला विचारलं. काय संबंध?

‘‘तुम्ही कोण?’’ मी तुसडेपणे विचारले.

‘‘गायतोंडे.’’

‘‘अच्छा-अच्छा. म्हणून असे दिसता होय?’’ मी अजून धुमसत होतो. एक तर साला ओळखत नाही आणि सरळ फायरब्रिगेडमध्ये भरती करतो, ‘‘तुम्ही देवनार कत्तलखान्यात नोकरी करता का?’’

‘‘तो माझा चुलतभाऊ.’’ गायतोंडे शेजारच्या मुलीकडे बघत म्हणाला. शेजारी बसल्यामुळे तिला पटवण्याचे त्याला जास्त चान्सेस आहेत असं बेटय़ाला वाटत होतं.

एकाएकी ती उठून गेली. माझ्या विनोदांपुढे शरण येऊन वश न होणे शक्य नाही हे तिनं ताडलं असावं. का देवानं मला इतकं बहुगुणी व तरुणींना वेड लावणारा बनवलं असावं? मला बासरी वाजवता येत असती तर मी श्रीकृष्ण म्हणूनच ओळखला गेलो असतो. राधा का भी श्याम और मीरा का भी श्याम!

पोरीचा व्यत्यय दूर झाल्यानंतर मी व गायतोंडेनं मनसोक्त गप्पा मारल्या. आम्ही कुठला विषय म्हणून शिल्लक ठेवला नाही. (शेवटपर्यंत त्यानं मला ओळखलं नाही. मी फरारी गुन्हेगार असतो तर याचा मला किती बरं आनंद झाला असता!) हिंदुस्थानचं परराष्ट्र धोरण, कश्मीरबाबतची भूमिका, वाढती महागाई, वाढतं प्रदूषण, स्वच्छता अभियान, पाण्याचा प्रश्न, भ्रष्टाचार, तूरडाळीचा प्रश्न, पेट्रोलच्या वाढत्या किमती, मुलांवरील संस्कार, वृद्धांचे प्रश्न, पाकिस्तानचा उपद्रव, लग्नसमारंभात होणारे अवाढव्य खर्च, शिक्षणविषयक चुकीची धोरणे, स्वयंपाकात गती नसणाऱया महिला, बेकारी, औषधांच्या भरमसाट किमती, डॉक्टरांचे पैसे उकळणे, धुणीभांडी करणाऱया मोलकरणींचे नखरे व अवाचेसवा मागण्या, बिल्डर्सची मुजोरी व त्यांचे राजकीय लागेबांधे, रस्त्यावरील खड्डे असे अनेक विषय आम्ही समग्र चर्चिले. त्यानंतर पुणे स्टेशन आल्यावर नाइलाजानं आम्ही थांबलो. विद्वानांच्या शहरात आम्ही काय अक्कल पाजळणार!

एव्हाना गायतोंडे-कणेकर ही जय-वीरूसारखी जोडी झाली होती. आम्ही हस्तांदोलन करून एकमेकांचा निरोप घेतला. लवकरात लवकर पुन्हा भेटायचं अशा आणाभाका झाल्या. पण दोघंही मनातून पक्कं जाणून होतो की पुन्हा भेटणं नाही. ही पहिली व शेवटची भेट होती. आम्ही एकमेकांचे पत्ते व टेलिफोन नंबर्स कुठे घेतले होते?…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या