रस्ते अपघातात ३५० जवान ठारअणुबॉम्बपेक्षाही प्रचंड मनुष्यहानी

98

>> अभय मोकाशी

आपल्या देशात दर मिनिटाला रस्ते अपघातात एकजण तरी मृत्युमुखी पडत आहे. तरीही आपल्याकडे रस्ते वाहतुकीच्या नियमांची, कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी व ठोस उपाययोजना केली जात नाही. वाहनचालक व कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत अपघाती मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही.

लाम जिलानी कासमी या तेरा वर्षांच्या मुलाचा डिसेंबर १, २०१७ रोजी रस्त्यावरील दुचाकी अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या पंधरा वर्षांच्या भावाने केलेले रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन. गुलाम जिलानीच्या भावाने जवळच जाऊन येतो असे सांगून आपल्या घरातील दुचाकी घेतली आणि त्याला मागे बसवून थेट ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावर भरधाव गाडी नेली. काही वेळातच दुचाकीचा अपघात झाला, ज्यात गुलाम जिलानीचा मृत्यू झाला. यात सर्वात मोठी चूक या दोन भावांच्या पालकांची आहे. या मुलांना दुचाकी चालविण्याची परवानगी नसताना त्यांच्या हाती दुचाकी देणे कायद्याने चुकीचे होतेच, पण ते आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला धोक्यात टाकणारेदेखील होते. आपली मुले किती लांब गाडी घेऊन जात आहेत हे महत्त्वाचे नाही. इतक्या लहान वयातील मुलांना रस्त्यावरील वाहनांचा आणि आपल्या वेगाचा अंदाज येत नाही, तसेच त्यांची अशा परिस्थितीत निर्णय क्षमता कमी असते.

देशभरात अनेक अल्पवयीन मुले आणि मुली विविध प्रकारची वाहने राजरोजपणे चालविताना दिसतात, तेही कित्येकदा वाहतूक पोलिसांच्या डोळय़ादेखत. सप्टेंबर २०१७ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘देशातील रस्ते अपघात – २०१६’ या केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन विभागाने अहवालात दिलेले रस्ते अपघाताची आकडेवारी धक्कादायक आहे. त्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात ४,८०,६५२ रस्ते अपघातात १,५०,७८५ मृत्यू झाले, म्हणजे अमेरिकेने दुसऱया महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर झालेल्या मनुष्यहानीपेक्षा अधिक. अणुबॉम्ब हल्ल्यात या दोन्ही शहरांमध्ये १,२९,००० लोकांचे प्राण गेले, असा अंदाज आहे. रस्ते अपघातातील मृत्यू दिवसाला सरासरी ४०० आणि २०१६ मध्ये नोंदविलेल्या १.५१लाख मृत्यूमुळे आपण रस्ते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू यात जगात पहिल्या क्रमांकावर आहोत, पण ही गर्वाची नव्हे, तर लज्जास्पद बाब आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडय़ांनुसार २०१५ मध्ये जगभरात रस्ते अपघातात १२.२५ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी आपल्या देशात १,४६, १३३ जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला, म्हणजेच त्या वर्षी जगभरात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीच्या १० टक्क्यांहून अधिक मृत्यू आपल्या देशात झाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रस्ते अपघातात प्राणहानी होणे हे कोणत्याही देशाला अशोभनीय आणि हानीकारक आहे. कारण मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ नष्ट होत आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, रस्ते अपघातात मृत्यूमुळे एकूण देशांतर्गत उत्पादनाचा तीन टक्के भाग कमी होतो. अशाप्रकारे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला हानी होतेच, पण यामुळे देशाचेदेखील मोठे नुकसान होते. आपल्या सुरक्षा दलातील ३५० जवान आणि अधिकाऱयांचा रस्ते अपघातात गेल्या वर्षात मृत्यू झाला, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने डिसेंबर२, २०१७ च्या आवृत्तीत नमूद केले आहे. सुरक्षा दलात इतके मृत्यू रस्ते अपघातात होतात हे धक्कादायक आहे.

राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेल्या अहवालात नोंद केली आहे की, २०१६ मधील रस्ते अपघातात झालेल्या १.५१ लाख मृत्यूपैकी १.३५ लाख मृत्यू वाहनचालकाने केलेल्या कायद्यांच्या उल्लंघनामुळे आहेत. यात सिग्नल तोडणे, गाडी वळविताना योग्य सिग्नल न देणे, वाहन अचानक मुख्य रस्त्यावर आणणे, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, लेन बदलताना काळजी न घेणे अथवा अचानक लेन बदलणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, अशा अनेक गुह्यांचा समावेश आहे.

रस्ते अपघाताचे आणखी एक कारण म्हणजे रस्त्यांची गुणवत्ता. रस्त्यांवरील खड्डे, अनावश्यक गतिरोधक आणि वळणावर रस्त्यांची चुकीची रचना, हे सर्रास आढळते. गतिरोधकांमुळे २०१५ साली ३४०९ जणांचा मृत्यू झाला. अधिकतर गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसने तयार केलेल्या गतिरोधकाविषयी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून बांधले जातात. अनेकदा नागरिकच रात्रीत गतिरोधक उभे करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यदेखील आपल्या विभागात गतिरोधक बांधण्याची मागणी करतात आणि ती मागणी या मार्गदर्शकांचे पालन न करता पुरी केली जाते.

गतिरोधकांची बांधणी कशी असावी, ते कुठे असावेत, तसेच पुढे गतिरोधक असल्याची जाणीव वाहनचालकांना कशी करून द्यावी, यासंदर्भातील माहिती या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आली आहे. रस्ते सुरक्षेच्या संदर्भात डॉ. एस. राजसेकरन यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नोव्हेंबर ३०, २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने २५ निर्देश दिले. देशात दर मिनिटाला एक रस्ते अपघाती मृत्यू होतो, याची दखल घेत न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना रस्ते सुरक्षेला गांभीर्याने घेण्यास सांगितले आहे.

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर गस्त घालण्यासाठी विशेष दलाची स्थापना करण्यास राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. या आधी सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा परिषद आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची स्थापना करण्याचे आदेश राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत तसेच रस्ते सुरक्षा निधी उभारण्यास सांगितले आहे. याचबरोबर एक कायमस्वरूपी रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना करून सुरक्षा कृती योजना रचण्यास सांगितले आहे. या आधीच्या निर्देशांवर योग्य कारवाई न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने आता विविध गोष्टींसाठी अंतिम तारीख ठरवून दिली आहे. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची स्थापना जानेवारी३१ , २०१८ पर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत, तर सुरक्षा कृती योजना राज्यांनी आणि केंद्र शासित केंद्रांची स्थापना मार्च ३१ , २०१८ पर्यंत करावी, असे सांगितले आहे.

हिंदुस्थानने ब्राझीलच्या ब्रासिलिया या शहरात नोव्हेंबर १८ आणि १९, २०१५ रोजी झालेल्या ‘सेकंड ग्लोबल हाय लेव्हल कॉन्फरन्स ऑन रोड सेफ्टी – टाईम फोर रिझल्ट’ यात भाग घेऊन, त्यात मंजूर करण्यात आलेल्या ठरावावर स्वाक्षरी केली आहे, मात्र त्यातील मुद्दय़ांकडे दुर्लक्षच केले जात आहे. त्या तरतुदींविषयी योग्य पावले उचलणे जरुरी आहे. हे सर्व होईपर्यंत देशभरात अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कठोरतेने करण्याची गरज आहे. वाहन चुकीच्या बाजूने चालविणारे, सिग्नल तोडणारे आणि अती वेगाने वाहन चालविणारे यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

अल्पवयीन मुले-मुली वाहन चालवत असताना आढळल्यास ते वाहन जप्त व्हावे आणि वाहनाच्या मालकाला दंड अधिक तुरुंगवास करण्याची तरतूद कायद्यात असणे आणि त्याची अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट न घालणे आणि वाहनचालकाने सीट बेल्ट न लावणे हे सर्वत्र आढळते, असा गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा करणे जरुरी आहे.

या सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे ते रस्ते सुरक्षा, कायद्याचे पालन करणे आणि वाहतूक पोलिसांचा मान राखणे यासंदर्भात लोकशिक्षण करणे. नियम तोडून, वाहतूक पोलिसाला न जुमानता पळून जाण्यात अनेकांना कर्तुत्व केल्यासारखे वाटते, हे सामाजिक दृष्टय़ा चांगले नाही. शेवटी वाहन चालक, मालक आणि प्रवासी यांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या