अखेर नमू भेटली

>> शिरीष कणेकर

‘ती सध्या काय करते?’ या माझ्या स्तंभावर वाचकांनी प्रतिक्रियेची राळ उडवली. बहुतेकांना पुढे काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. नमूला आत घेण्यासाठी मी दरवाजा उघडायला जातो आणि मी तिथेच लेख संपवला होता. उत्कंठावर्धक चित्रपटाचं शेवटचं रीळ हरवावं असं काहीसं वाचकांचं झालं होतं. मी मात्र चटका लावणारा साहित्यिक शेवट केल्याच्या आनंदात होतो (लेख अर्धाच आलाय का छापून? असं विचारून माझ्या एका मित्रानं माझी मस्ती जिरवली ते सोडा).

ठीक आहे, वाचा पुढे काय झालं ते. नंतर म्हणू नका ‘कशाला, सांगत बसलात?’ पुढे काय झालं ते न सांगण्यातच खरी गंमत होती. वाचकांच्या कल्पनाशक्तीवर गोष्टी सोडून देण्याची कल्पना कशी वाटते? असो.

मी दार उघडलं. दारात ‘ती’ उभी होती. ती येणार होती, आली होती म्हणून तिला नमू म्हणायचं. एरवी मी तिला रस्त्यातच काय, पण आमच्या जिन्यातही ओळखली नसती. माझ्या डोळय़ांसमोर असलेली सोळा वर्षांची अस्फुट, अधोन्मिलित कळी आता वृक्षाची वठलेली फांदी झाली होती. अर्थात त्यात तिचा काय दोष? साठ वर्षांत एवढी पडझड होणारच. तिचा गोल, गोड, लोभसवाणा चेहरा पार सुकून गेला होता. ही गोष्ट मला त्रास देत होती. त्यातली अपरिहार्यता कळून व मान्य असूनही मी मनाविरुद्ध हिरमुसला झालो होतो.

‘‘मी पण तुला ओळखलं नसतं.’’ ती म्हणाली आणि थांबली. माझ्यातील बदलांविषयी बोलून ती मला दुखवू इच्छित नव्हती. आम्ही आयुष्यात प्रथम बोलत होतो आणि तरीही एकमेकांना बिनदिक्कतपणे एकेरीत संबोधत होतो. वाटून गेलं की, काही मिनिटांसाठी तरी पुन्हा सोळा वर्षांचं व्हावं, पुन्हा तसंच दिसावं, तसंच लाजरंबुजरं वागावं. तिनं हातातली पुस्तकं बाकावर ठेवीत माझ्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकावा. तिच्याऐवजी मीच गुदमरून नजर हटवावी. ती गुजराथी होती हे शाळेत असताना मला कधीच जाणवलं नव्हतं. आता का कुणास ठाऊक, उगीचच जाणवत होतं. ती माझ्याशी कधीच बोलली नव्हती, पण कोणाशी बोलायची तेव्हा मराठीच बोलायची. तिचा गोड आवाज मी कानांनी अधाशासारखा टिपायचो.

आता आम्ही आमने सामने बसलो होतो व काय बोलायचं याचा विचार करीत होतो. चार वर्षे एका वर्गात असून आम्ही एकमेकांशी चकार शब्दही बोललो नव्हतो. आता एकदम धाडधाड कसं व काय बोलायचं? एकाएकी मला वाटून गेलं की मी सर्वस्वी अनोळखी बाईशी बोलतोय. तिच्यात नमू कुठं होती? आता बोलणं जास्तच अवघड वाटत होतं. मी पुढाकार घेतला. साठ वर्षांपूर्वी करायला हवं होतं ते मी बहुतेक गवऱया स्मशानात गेल्यावर करीत होतो. वर्गातली मुलं आणि मुली आता कुठं असतात, काय करतात हा हमखास रंगणारा विषय मी ऐरणीवर घेतला. ती रमून बोलू लागली.

‘‘तुला मंदा तंटक आठवत्येय?’’ नमू उत्साहानं म्हणाली, ‘‘ती नागपूरला असते.’’

‘‘ज्योत्स्ना मेहताच्या साडीत वटवाघूळ घुसलं होतं, आठवतंय?’’

मी विचारलं, ‘‘कसला हंगामा झाला होता!’’

नमू मोकळी हसली. तिच्या डोळय़ांत क्षणभर जुन्या नमूची चमक दिसली. वाटल,ं आत्ता सुळे मॅडम येतील व डोळे वटारतील. सुळे सर सायन्स शिकवायचे आणि सूक्ष्मचा उच्चार ‘स्मूक्ष’ असा करायचे. नमूला आठवलं व ती पुन्हा हसली.

‘‘शशी कोटणीस पुण्याला असतो.’’ मी माहिती पुरवली, ‘‘तो सहकुटुंब माझ्या कार्यक्रमाला आला होता. मी त्याला ओळखलंच नाही.’’ नमूला तरी कुठं ओळखलं होतं म्हणा!

नमूची मुलगी अमेरिकेत माझ्या मुलीच्या जवळच राहत होती. यावर काय बोलावं हेच मला सुचेना. मी तिच्यात आठवणीतली नमू शोधत होतो. तीही कदाचित माझ्यात टेबल टेनिस खेळणारा शेलाटा मुलगा शोधत असेल. ‘शोधा म्हणजे सापडेल’ हे तत्त्व दोघांनाही लागू पडत नव्हतं. काळाचा निर्घृण हल्ला आम्ही दोघंही झेलू शकलो नव्हतो. तिची ‘बायपास’ शस्त्र्ाक्रियाही झाली होती. मी अनेक दुखण्यांनी जराजर्जर झालो होतो. डोळय़ांतून पाणी यायला मला काहीही निमित्त पुरत होतं. नंतर सवडीनं मी कारणं शोधत होतो.

नमूनं मला जेवायला बोलावलं.

‘‘बाप रे!’’ मी चित्कारलो, ‘‘म्हणजे कांदा व लसूण नसलेलं जेवण.’’

नमू कांदा व लसूण खात नाही ही बहुमोल माहिती मला कुठून मिळाली असेल? अन् साठ वर्षे ती माझ्या डोक्यात होती? मानवी मेंदू विचित्रच म्हणावा लागेल. माझा तर नक्कीच.

‘‘नाही रे बाबा’’ नमू घाईघाईनं म्हणाली, ‘‘सून आली आणि ही जुनी बंधनं निकालात निघाली.’’

‘‘आता नॉन-व्हेजही खातेस?’’

‘‘नाही-नाही अजिबात नाही.’’ ती तोंडात मारून घेतल्यासारखं करीत म्हणाली.

नमूची मुलं खूप शिकली होती. माझीही मुलं खूप शिकली होती. तिची नातवंडं हुशार होती. माझीही नातवंडं हुशार होती. काय बरळतोय मी गाढवासारखा. म्हणूनच या वयात चळ भरतो व बुद्धी भ्रष्ट होते असे म्हणतात.

‘‘तुझ्या मनात तेव्हा मला टिकलीएवढं स्थान होतं का ग’’, हा प्रश्न विचारण्याचं मी कटाक्षानं टाळलं. काय फरक पडतो? व्हॉट डिफरन्स डझ इट मेक? तरीही वाटतं की, मी विचारलं असतं आणि ती ‘‘हो म्हणाली असती तर कुठेतरी पोळलेल्या मनावर एक सुखाचा शिडकावा झाला असता. आयुष्यातील पराभवांची बोच कमी झाली असती.

लवकरात लवकर पुन्हा भेटण्याचे वायदे करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला, पण मला पुन्हा भेटण्याची आंतरिक ओढ नव्हती. माझ्यासाठी ही नवीन ओळख होती. म्हातारपणी झालेली. मला नमू कुठे भेटली होती? म्हणूनच असेल कदाचित मी तिच्याशी निघताना निर्जीव हस्तांदोलन केलं…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या