रोखठोक : मोदी यांचा नेहरू मार्ग!

163

rokhthokसध्याच्या मोदी सरकारने नवीन असे काय केले? सरकारने काँग्रेसचाच मार्ग स्वीकारला आहे व नेहरूंवर टीका करणारे पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंच्याच मार्गाने देशाला पुढे ढकलायचे ठरवले आहे. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीची कमाल आहे. त्यांनी हे आधीच ओळखले असावे.

देशातील राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे बनत आहे?

सध्याचे ‘मोदी सरकार’ काय करीत आहे? त्यांनी नवीन असे काहीच केले नाही. नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांना रोज लाखोली वाहिली जाते. नेहरू-गांधी परिवाराच्या धोरणांमुळे व काँग्रेसच्या लुटमार संस्कृतीमुळे देशाची वाट लागली व आपण गरीब झालो असे ते रोजच सांगतात. प्रत्यक्षात स्वतः मोदी हे नेहरू मार्गाने चालले आहेत व काँग्रेसने जे पेरले तेच टिकविण्यासाठी भाजप धडपडत आहे. ब्रिटिशांनी व काँग्रेसने लुटले हे ठीक आहे, पण आता लूट थांबली आहे काय? तर अजिबात नाही.

हिंदीत एक शेर आहे की, ‘‘नौ छेद पेंडा गायब, गला नदारत यही झज्जर मुफलीस को मिला.’’ म्हणजे तहानलेल्या माणसाला ९ भोके असलेला, तळ नसलेला, मान तुटलेला असा खुजा पाणी पिण्यास मिळाला.’’ त्यामुळे जनतेची कोणतीच तहान भागत नाही. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत श्री. राहुल गांधी यांनी सांगितले, पुढील पाच वर्षांत एक कोटी लोकांना नोकऱया देऊ. वर्षाला १२ ते २० लाख लोकांना रोजगार देण्याची खात्री राहुल गांधी यांनी दिली. श्री. नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याआधी हेच सांगत होते. प्रत्येक हाताला काम मिळेल. पाच कोटी नोकऱ्या देऊ, पण प्रत्यक्षात निवडणुकीतली वचने ही उकळत्या तेलात फुटलेल्या बटाटावडय़ासारखी झाली आहेत.

विकास हरवला तेव्हा…
गुजरात विधानसभा निवडणुकीत नेमके काय झाले? भाजपच्या प्रचारातून विकासाचा मुद्दाच हरवला. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारातही गुजरातचीच पुनरावृत्ती होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले, ‘‘हातात कागद न घेता पंधरा मिनिटे भाषण करून दाखवा!’’ पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, ‘विश्वेश्वरय्या’ शब्द उच्चारून दाखवा. यावर सोशल मीडियावर श्री. उदय जोशी यांनी उत्तम प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणतात, ‘‘एक पंतप्रधान दुसऱ्या पंतप्रधान पदेच्छुकाला जाहीर सभेत ‘विश्वेश्वरय्या’ शब्द उच्चारून दाखव म्हणून आव्हान देतोय! देशापुढचे बाकी सर्व प्रश्न संपले आहेत. सर्वत्र आबादी आबाद झालीय. काही म्हणजे काही करायचे बाकी उरले नाहीए. त्यामुळे आता या मुद्यांवर गाडी आलीय. बोला, भारत माता की जय!’’ माझ्या माहितीप्रमाणे श्री. जोशी हे पार्ल्यात राहतात व ते भाजपला अनवधानाने २०१४ साली मतदान करणाऱ्या पांढरपेशा समाजाचे प्रतिनिधित्व करतात म्हणून जोशींचे मोदींविषयी बदललेले मत मला महत्त्वाचे वाटते.

पदरी काय पडले?
ब्रिटिश गेले व स्वराज्य मिळाले, म्हणजे स्वातंत्र्य पदरी पडले या भ्रमातून आता आपण सगळेच बाहेर पडायला हवे. येणारा प्रत्येक राज्यकर्ता हा ‘ब्रिटिशां’चा बाप असल्यासारखा वागतो आणि जनतेला गुलाम समजून देश आपले साम्राज्य समजतो. स्वातंत्र्य हे प्राप्त होईपर्यंत साध्य असते आणि प्राप्त झाल्यावर ते एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे साधन ठरते. लॉर्ड अॅक्टनने असे म्हटले आहे की, स्वातंत्र्य हे अखेरचे ध्येय असू शकत नाही. ते एक राष्ट्रीय आकांक्षा प्राप्त करून घेण्याचे साधन आहे. स्वातंत्र्य प्राप्त करण्यापूर्वी काँग्रेसचे हेच ध्येय होते.

१९ व्या शतकात काँग्रेसची स्थापना होण्याआधी ब्रिटिश अंमलाविरोधात प्रचंड चीड निर्माण करणारी गोष्ट म्हणजे ब्रिटिश अमलाने आमचे दारिद्रय़ वाढवले असे प्रत्येक हिंदुस्थानी नेता जनतेसमोर सांगत होता. हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती ही राजकीय आंदोलनाची एक प्रेरणादायी शक्ती होती. हिंदुस्थान लुटला गेला आहे. २५ टक्के लोक अर्धनग्न आणि अर्धपोटी आहेत. तितकीच टक्के माणसं पूर्ण दरिद्री आहेत. हिंदुस्थानचे माणशी उत्पन्न सर्वात कमी असून शासनाचा खर्च व संरक्षणाचा खर्च अतिरेकी आहे, असे अधिवेशनामागून अधिवेशनात काँगेसने ठराव पास केले आहेत. एक वेळ राजकीय गुलामगिरी परवडली, पण आर्थिक गुलामगिरी ही माणसाला निःसत्त्व व लाचार करते, अशी काँग्रेसची विचारसरणी होती. म्हणजे स्वातंत्र्य मिळाले की दारिद्रय़ाचा नायनाट होईल. संरक्षण खर्च कमी होऊन ती रक्कम जनतेच्या विकासावर खर्च होईल. शासनाचा खर्च कमी होईल, अशी स्वाभाविक आशा होती. त्या आशेची किरणे हळूहळू अंधकारमय झाली व ब्रिटिशांचे राज्य बरे होते असे वाटू लागले. काँग्रेस राजवटीस कंटाळलेल्या लोकांनी आता मोदी यांचे राज्य आणले तर तेथेही सर्व आशा मावळल्या व आधीचे राज्य बरे होते असे लोकच म्हणू लागले. उपासमार व दारिद्रय़ाचा आकडा तोच आहे. चार वर्षांत बेरोजगारी कमी झाली नाही. संरक्षणावरील खर्च वाढतो आहे. शासनाचा खर्च व पंतप्रधानांच्या परदेश दौऱयाचा खर्च सारखाच आहे. फक्त खुर्च्यांवरील माणसे बदलून स्वातंत्र्य मिळत नाही व परिवर्तन होत नाही, हे आता पटू लागले आहे.

कुंचल्याचे भविष्य
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वप्रथम व्यंगचित्रकार होते व त्यांना राजकीय भविष्याची जाण होती. त्यांनी पन्नासच्या दशकात कुंचल्याचे जे फटकारे मारले ते आजच्या युगातही तंतोतंत लागू पडतात. चित्रे तीच, शब्दही तेच, पण चित्रांच्या मानेवरील डोकी बदलली इतके सर्व खरे वाटते.

A Vagabond!

rokhthok-cartoon
या व्यंगचित्रात उघडय़ा मोटारीत बसलेले खुशालचेंडू नेहरू आहेत व आजूबाजूला अठराविश्वे दारिद्रय़ाचा पसारा दिसत आहे. १९५६ साली रेखाटलेल्या व्यंगचित्रातून बाळासाहेबांना सांगायचे आहे, गरीबांविषयी कळवळय़ाचे ढोंग नेहरू नेहमीच करीत. नेहरूंनी जाहीर केले की, मी देशातील भटक्या, विमुक्तांपैकीच आहे. कुठेही उघडय़ावर राहू शकतो. प्रत्यक्षात आलिशान उघडय़ा मोटारीतून फिरणे एवढय़ापुरतेच नेहरूंचे हे ‘भटके’पण मर्यादित होते (आता या चित्रांत नेहरूंच्या जागी आपल्या मोदींना पहा).

A Day at the Zoo!

rokhthok-cartoon-2
म्हणजे ‘प्राणिसंग्रहालयातील दिवस.’ बाळासाहेबांनी एक राजकीय प्राणिसंग्रहालय हुबेहूब रेखाटले आहे. का? तर नवी दिल्लीत प्राणिसंग्रहालय निर्माण करण्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात नेहरू मंत्रिमंडळ म्हणजे एक प्रकारे प्राणिसंग्रहालयच होते. दोन पायांचे हत्ती, माकडे, ससे, उंट, जिराफ असे सर्वच प्राणी आपापल्या वैशिष्टय़ांसह तेथे होते (येथे मोदींचे मंत्रिमंडळ डोळय़ांसमोर आणा).

१९६० साली बाळासाहेबांनी रेखाटलेल्या एका चित्राने तर मी थक्क झालो व मला पंडित नेहरूंत सध्याचे पंतप्रधान मोदी दिसू लागले. अनेक माईक्स, कॅमेरे, आकाशवाणीचे तेव्हाचे ‘दांडेकर’ यांच्या गराडय़ात भारत भाग्यविधाते नेहरू स्वतःला हरवून बसले आहेत. कितीही थकलेले असले तरी ‘कॅमेरे’ दिसताच नेहरूंना तरतरी येई. नेहरूंचे पांडित्य म्हणजे बोलघेवडेपणाचा कळस! माईक-कॅमेरा यांच्या गराडय़ात नेहरूंचा चेहरा सफरचंदापेक्षा जास्तच गुलाबी होत असे. कॅमेऱयांसाठी विविध ‘पोझ’ देणे हा तर त्यांचा छंदच!

हे चित्र पाहताच नेहरूंच्या जागी मला नरेंद्र मोदी दिसले.

नेहरू अमर आहेत, मोदी नेहरूंच्याच मार्गाने देशाला ढकलत आहेत.

काँग्रेसने मोदींवर टीका करणे आता तरी बंद केले पाहिजे!

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या