यशाचे रंग

प्रतिनिधी

पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणं… ऑस्करसाठी नामांकन मिळणं… गौरी गाडगीळ… सनी पवार… या यशाचे रंग काही निराळेच आहेत…

नेत्रदीपक यश

 यंदा ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेल्या ‘लायन’ या सिनेमात भूमिका करणारा मुंबईकर सनी पवार एका रात्रीत स्टार झाला. सनीच्या बाबतीत तर ‘तो आला, त्याने काम केले आणि त्याने जिंकून घेतले’ असेच म्हणावे लागेल…

सनीला हे सगळे स्वप्नच वाटत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकल्यानंतर त्याने सिनेमात केलेल्या कामाच्या झालेल्या कौतुकाने सनी खरं तर भावुकच झाला आहे. मराठीमध्येच हिंदीत उत्तरे देताना सनीमध्ये धाडस दिसून येते. पण त्याचा कमालीचा आत्मविश्वासही आवडतो.

सनी म्हणतो की, मी मुंबईतच मोठा होत आहे. सांताक्रुझला कॉलनीत राहतो. इंग्रजी शाळेतच शिकतो. शाळेत इंग्रजी, हिंदी बोलतो. घरी आजूबाजूला राहणारी शेजारपाजारची मंडळी हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे हिंदीत जास्त बोलण्याची सवय झाली आहे. तसे आम्ही मूळचे सोलापूरचे. कैकाडी समाजातले. घरी मी, माझे आई-वडील, आजोबा यांच्याबरोबर कैकाडी भाषेतच बोलतो.

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविल्यानंतर कसे वाटते असे सगळेच विचारतात. खरे तर आनंद होतो, लोक कौतुक करतात, प्रेम करतात, माझ्याबरोबर फोटो काढतात… पण हे सगळे मिळालेले यश टिकवून ठेवणे याला मी महत्त्व देणार आहे. गेल्या काही दिवसांत अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आहे, पण अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे अभ्यास आणि काम यामध्ये बॅलन्स करायचा आहे. कलिना ते ऑस्करपर्यंतचा माझा प्रवास सगळय़ांना आश्चर्यकारक वाटतो आहे. पण हा प्रवास अधिक चांगला करण्याचा, उज्ज्वल करण्याचा प्रयत्न यापुढे असेल. मी आठ वर्षांचा असलो तरी आज ऑस्करमध्ये मान्यवरांनी केलेले कौतुक यांनी भारावून गेलो आहे.

‘लायन’ या सिनेमात मी सरूची भूमिका केली. सल ब्रायरली या मूळ हिंदुस्थानी असलेल्या, पण ऑस्ट्रेलियन दांपत्याने दत्तक घेतल्याने तिथेच लहानाचा मोठा झालेल्या तरुणाची कथा या सिनेमात आहे. या सिनेमासाठी मी प्रॉपर ऑडिशन दिली. साधारणपणे तीन मोठय़ा शहरांमधून तब्बल दोन हजार मुलांच्या ऑडिशन्स सरू या भूमिकेसाठी झाल्या, पण कदाचित ही भूमिका माझ्या नशिबात होती. त्यामुळे मला ती मिळाली.

ऑस्कर पुरस्काराच्या वेळी मी केलेल्या पोषाखाचेसुद्धा खूप कौतुक झाले. खरे तर त्यावेळी मनात खूप धडधड होत होती, पण माझ्या वडिलांच्या साथीने मी आत्मविश्वासाने ऑस्करला पोहोचलो. खरे तर हा अनुभव आयुष्यभर मनात आठवण ठेवून देणारा आहे. ‘लायन’ या सिनेमात काम केल्याने मी आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलो, सर्व जगातून कौतुक झाले, पण यापुढे सतत काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न राहील.

स्पेशल गर्ल

काही वर्षांपूर्वी महेश लिमये दिग्दर्शित ‘यलो’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असलेली गौरी गाडगीळ आपल्या आजाराशी सामना करत आयुष्यात प्रगती करते. आता याच गौरीने शैक्षणिक यशही मिळवले आहे. याच निमित्ताने गौरीशी साधलेला संवाद.

यलो हा एक असा सिनेमा आहे ज्याने डाऊन सिंड्रोम असलेली मुलेही चारचौघांसारखे आयुष्य जगू शकतात हे दाखविण्याचा प्रयत्न केला. या सिनेमात आपल्या अभिनयाने सगळय़ांची मने जिंकलेली गौरी गाडगीळ हिने तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. स्पेशल चाईल्ड गौरी आता ग्रॅज्युएट झाली आहे. याबाबत बोलताना गौरी सांगते की, मी कला आणि समाजशास्त्र् विषयात पदवी मिळविली आहे. मुळातच ग्रॅज्युएट झाले आहे. आता याच विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे. ग्रॅज्युएट झाल्यावर कन्व्होलेशन प्रोग्रॅमला गाऊन घालून प्राचार्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना झालेला आनंद शब्दातीत आहे. या सगळय़ा यशात मला मार्गदर्शन करणारे माझे गुरू, माझी आई या सगळय़ांचा मोठा वाटा आहे. यांच्याशिवाय इथपर्यंत पोहोचूच शकले नसते

मला ग्रॅज्युएट झाल्यावर अनेकजण विचारतात, आता पुढे काय? पण खरे सांगू का… इतर मुलांसारखेच मला पण आयुष्यात काय करायचे आहे हे ठरले आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन एकीकडे करीत असताना मला स्वीमिंगचे कोच व्हायची इच्छा आहे. गेली अनेक वर्षे मी स्वीमिंग करते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळय़ा स्पर्धांत भाग घेऊन यश मिळविले आहे. पण आता मला माझे ज्ञान गुरूच्या भूमिकेतून द्यायचे आहे. दररोज दोन तास व्यायाम, दोन तास स्वीमिंग, मग कॉलेज, संध्याकाळी भरतनाटय़म् असे माझे रुटीन असते. इतर मुलींसारखे मला पण नाच खूप आवडतो. गेल्या १० वर्षांपासून अधिक काळ मी भरतनाटय़म् शिकते आहे. येत्या एप्रिल महिन्यात भरतनाटय़म् परीक्षा देणार आहे. डान्स आणि स्वीमिंग यामुळे माझा स्टॅमिना चांगला राहण्यास मदत हेते. दोन्ही हॉबीज आज माझ्या पॅशन बनले आहे. या आतापर्यंतच्या प्रवासात माझी साथसोबत करणाऱया सर्वांचे मनापासून आभार! असेच प्रेम माझ्यावर करीत राहा.

‘गॉडस् स्पेशल चाईल्ड’ असे माझी आई माझ्या बाबतीत नेहमी म्हणते. डाऊन सिंड्रोम असा आजार असूनही गौरीने स्वीमिंगमध्ये मिळवलेले यश हे अद्भुत तर आहेच पण आता गौरीने शैक्षणिक पातळीवरही आपले यश सिद्ध केले आहे. स्वीमिंग आणि डान्स या गौरीच्या दोन छंदांनी तिला तिचा आत्मविश्वास, संयम मिळवून देण्यास मदतच केली आहे. गौरीला मिळालेल्या यशाबद्दल तिचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

 

आपली प्रतिक्रिया द्या