रंगांची भाषा

 देवदत पाडेकर

 होळी हा एकमेकांवर रंग उधळण्याचा सणसणांप्रमाणेच निसर्गाचा रंगांशीही घनिष्ट संबंधज्याला आयुष्यात फक्त रंगांनीच सारं काही मिळवून दिलंय असा चित्रकार रंगपंचमी आणि रंगांकडे कोणत्या दृष्टीने पाहून आपली दृष्यात्मक कला साकारतोते पाहूया

 रंग रंगांशिवाय या जगाची आपण कल्पना करूच शकत नाही. चित्रकाराला तर मनमुक्त अभिव्यक्तीसाठी रंग हेच माध्यम असतं. निसर्गातील हे रंग जेव्हा कॅनव्हासवर उतरतात तेव्हा चित्रकाराची अभिव्यक्ती रंगभूषेने सजीव साकारते. या सर्वच रंगांची प्रसंगानुरुप जातकुळी वेगळी…

रंगपंचमीसाठी वापरात येणारे रंग खूप गडद असतात. या रंगाला मर्यादा आहेत. कारण या रंगांमध्ये वेगवेगळ्या छटा नाहीत. त्याऐवजी चित्रातल्या रंगांच्या अनेक छटा आहेत. हे रंग अमर्याद आहेत. मात्र यातील गमक असं आहे की, जेव्हा आपण एखादे छायाचित्र काढतो तेव्हा छायाचित्रात ते रंग येत नाहीत जे प्रत्यक्षात चित्रात दिसतात. मात्र चित्रकाराच्या दृष्टीला ते जाणवतात.

निसर्ग आपली नैसर्गिकता जपतो

निसर्गातले रंग चित्रामध्ये आणणं खूप कठीण असतं. ते जसेच्या तसे चित्रात आणता येत नाहीत. कारण निसर्गही आपली नैसर्गिकता जपत असतो. चित्र काढण्यासाठी जे रंग वापरले जातात ते नैसर्गिक नसतात. ते रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले असतात. त्यामुळे तयार केलेल्या  रंगांची निसर्गाच्या रंगांशी तुलना करता येत नाही. चित्रकार निसर्गातल्या रंगांच्या जवळ जाऊ शकतो, पण जसेच्या तसे ते कॅनव्हासवर आणू शकत नाही. म्हणून निसर्गाकडून प्रेरणा घेतलेल्या चित्रकाराला निसर्गातील रंग जसेच्या तसे कॅनव्हासवर उतरवणे म्हणजे एक आव्हान असते. सप्तरंगांव्यतिरिक्तही निसर्गात अनेक रंग आहेत. उदा. जंगलात वेगवेगळी झाडे असतात. त्या प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग वेगळा असतो. सूक्ष्म निरीक्षणाद्वारे हिरव्या, निळ्या आणि करडय़ा इत्यादी रंगांच्या अनेक छटा चित्रकाराला दिसतात.

कलेला मोजमाप नाही

ब्लॅक ऍण्ड व्हाईट पेंटिंग, ऑईल पेंटिंग, वॉटर कलर, पेस्टल कलर ही जशी चित्रांची वेगवेगळी माध्यमं आहेत, त्याचप्रमाणे स्केचेस किंवा ड्रॉइंग हेही एक माध्यम आहे. मोठय़ा कॅनव्हासवर काळ्या आणि पांढऱया रंगामध्ये अनेक शेडस् काढता येतात. चित्रकाराच्या या कलेचं मोजमाप करता येत नाही. प्रत्येक चित्राचं आपापलं एक वैशिष्टय़ असतं. प्रत्येक व्यक्ती ही चित्राकडे आपापल्या दृष्टीने पाहते. प्रत्येकाची चित्राची आवड वेगवेगळी असून प्रत्येकाला आपल्या विचार आणि दृष्टिकोनातून चित्र भावतं. त्यामुळे एक चांगलं चित्र तयार होण्यासाठी त्यामध्ये रंग कसे, कोणते वापरले आहेत, चित्राची रचना कशी आहे, चित्र कसं रेखाटलंय हे पाहणं गरजेचं ठरतं. तरंच ते चित्र बऱयाच जणांना भावतं.

रंगांमुळे चित्राला सजीवता येते

चित्रात सगळ्यात महत्त्वाचा भाग रंगांचा आहे. चित्रात रंग असल्यामुळेच चित्राला सजीवता प्राप्त होते. म्हणून आम्ही चित्रकार रंगांना प्राधान्य देतो. कोणतीही कला निसर्गाकडून प्रेरणा घेऊन साकार होते, निसर्गासारखी घडू शकत नाही.

रंगातून चित्र व्यक्त होतं

प्रत्येक चित्र काढायच्या आधी ते ब्रश किंवा पेन्सिलने कशा पद्धतीने काढलं जातंय यावर त्याचं व्यक्त होणं अवलंबून असतं. प्रत्येक चित्रकाराची ब्रश, रंग इत्यादी चित्रकलेची माध्यमं हाताळण्याची पद्धत वेगवेगळी असते.  केवळ रंगातून चित्र व्यक्त होऊ शकतं. काही वेळा पेन्सिलने ड्रॉ न करताही चित्र केवळ रंगांनीच नेत्रसुख देऊ शकतं.

बघणाऱयाला चित्र भावणं महत्त्वाचं…

व्यक्तिचित्र साकारताना समोर बसलेल्या व्यक्तीच्या त्वचेचा रंग, तिचं चारित्र्य चित्रातून डोकावतं. यामध्ये त्या व्यक्तीचे हावभाव, चेहऱयावरील भावना, डोळ्यांमधील भाव इत्यादी अनेक पैलू महत्त्वाचे ठरतात. तसेच एकाच चित्रामधील अनेक व्यक्तींमध्ये एकाच व्यक्तीकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर त्याकरिता चित्रकाराला काही वेगळी तंत्रेही वापरावी लागतात. निसर्गचित्रात निसर्गातील वातावरण निर्माण होणं गरजेचं असतं. तेव्हाच चित्रातला निसर्ग बघणाऱयाला भावतो. चित्रकाराची सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि हावभाव यामुळे चित्रं व्यक्त होत असतं.

आपली प्रतिक्रिया द्या