‘माझ्याबरोबर चांद्रसफारीवर या’… अब्जाधीशाचे आवाहन

चंद्रावर जाण्याचे स्वप्न बरेच जण पाहात असतात. पण आता हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण एका अब्जाधीशाने लोकांना चंद्रावरील सहलीला न्यायचे ठरवले आहे.

जपानमधील एक अब्जाधीश 2023 साली ही चांद्रयान यात्रा करणार आहे, पण आश्चर्य असे की, हा प्रवास त्याला एकट्याने करायचा नाही, तर यासाठी तो आपल्यासोबत आठ जणांना नेणार आहे. चांद्रयान सहलीकरिता त्याच्या सोबत येण्याचे आवाहनच त्याने लोकांना केले आहे. युसाकू मेजावा (45) असे या उद्योगपतीचे नाव आहे.

युसाकू हा म्युझिक बँड परफॉर्मर होता. सध्या तो जपानमधील उद्योगपती आहे. जगभरातील लोकांना त्याने चंद्रावरील सफरीला येण्याकरिता आवाहन केले आहे.

डियर मून प्रोजेक्ट असे त्याच्या या चांद्रयान मोहिमेचे नाव आहे. या प्रवासाचे वैशिष्ट्य असे की, चंद्रावर सहलीसाठी ज्यांना जायचे आहे, त्यांना विनामूल्य या सहलीचा आनंद घेता येणार आहे. या अवकाश सहलीला ज्यांना जायची इच्छा आहे त्यांना एक रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही.

त्याने दिलेल्या या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ऑफरकरिता चक्क 3 लाख लोकांनी अर्ज केले आहेत. जगभरातील लोकांना युसाकू यांनी चंद्रावरील प्रवासाचे आमंत्रण दिले आहे.

चंद्रावर सहलीकरिता अर्ज करणाऱ्यांपैकी हिंदुस्थानातील लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर अमेरिका, जपान आणि फ्रांस या देशांमधील लोकांचे अर्ज आले आहेत.

युसाकू यांच्या स्पेस यानाला चंद्रावर जाण्यास तीन दिवस लागतात. त्यानंतर चंद्रावरील आजूबाजूचा परिसर फिरल्यानंतर त्यांचे यान पुन्हा पृथ्वीवर परत येईल. त्यांच्या डियर मून प्रोजेक्ट या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीने घेतली आहे.

14 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
उद्योगपती युसाकू यांच्या डियर मून प्रोजेक्ट या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील सफरीला जाण्याकरिता 14 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन युसाकू यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील लोकांच्या सहभागामुळे या सहलीला एक वेगळेपण नक्कीच प्राप्त होईल असे त्यांचे म्हणणे आहे. 21 मार्च रोजी अर्ज तपासणी झाल्यानंतर अर्जदारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. त्यानंतर पुढच्या वर्षी मे महिन्यात मुख्य मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर चंद्रावरील सहलीला जाण्याकरिता आठ लोकांची निवड केली जाईल, अशी माहिती युसाकू यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या