Raju Srivastav कॉमेडीयन राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले

प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या ते सीसीयू (कार्डियक केअर युनिट)मध्ये उपचार घेत आहेत. प्रकृती गंभीर होण्याआदी त्यांच्यावर इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

बुधवारी दिल्ली येथील हॉटेलमधील जिममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर बुधवारीच अँजिओग्राफी करण्यात आली होती. यात ह्रदयाच्या एका भागामध्ये 100 टक्के ब्लॉक आढळल्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बड्या नेत्यांच्या भेटीसाठी राजू श्रीवास्तव दिल्लीमध्ये थांबले होते. हॉटेलमधील जिममध्ये ट्रेडमीलवर धावत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले आणि ते कोसळले. त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात केले.

राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीतील बादशाह मानले जाते. अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये त्यांनी काम केलंय. राजू श्रीवास्तव गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना हसवताहेत. स्टेज शोजद्वारे त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती. बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करत असतानाच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. कॉमेडीनंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.