Raju Srivastav कॉमेडीयन राजू श्रीवास्तव एम्स रुग्णालयात दाखल, जिममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा झटका

प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची अचानक तब्येत बिघडली आहे. राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बंधूने आणि पीआरओने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजू श्रीवास्तव यांना हॉटेलमधील जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला. ट्रेडमीलवर धावत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले आणि ते कोसळले. यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एण्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन वेळा सीपीआर देण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉ. नितीश न्याय यांच्या पथकाद्वारे उपचार सुरू आहेत. जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना रुग्णालयात आणले. दोन वेळा सीपीआर दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे.

राजू श्रीवास्तव यांचे बंधू आशिष यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून आहे. बड्या नेत्यांच्या भेटीसाठी ते थांबले होते. या दरम्यान ते जिममध्ये गेले आणि तिथे त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून नातेवाईकांना भेटीचीही परवानगी देण्यात आल्याचे आशिष यांनी सांगितले.

राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीतील बादशाह मानले जाते. अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये त्यांनी काम केलंय. राजू श्रीवास्तव गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना हसवताहेत. स्टेज शोजद्वारे त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती. बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करत असतानाच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. कॉमेडीनंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.