कॉमेडी ‘क्वीन’ भारती सिंहला अटक, NCB च्या छापेमारीत घरामध्ये आढळले ड्रग्ज

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंह हिच्या घरी शनिवारी अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) छापा टाकला. या छापेमारीमध्ये भारती हिच्या घरी ड्रग्ज आढळून आल्याची माहिती मिळत आहे. छापेमारीनंतर एनसीबीच्या पथकाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

तब्बल 4 ते 5 तास दोघांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान भारती आणि पती हर्षने गांजा घेतल्याची कबुली दिली आहे. यानंतर एनसीबीने भारतीला अटक केली आहे. हर्षची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, भारतीला आजची रात्र एनसीबी ऑफिसमध्ये ठेवण्यात येणार असून उद्या सकाळी तिला न्यायालयात हजर केले जाईल.

एनसीबीने ड्रग्ज पेडलरने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीच्या घरासह तीन ठिकाणी शनिवारी छापे टाकले. यात भारतीच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. याबाबत एनसीबीचे मुंबई झोनचे अधिकारी समीर वानखेडे यांनी माहिती देताना सांगितले की, भारती आणि तिचा पती हर्ष यांना नशेचा पदार्थ जवळ बाळगल्याबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, याबाबत एएनआयने अधिक माहिती देताना सांगितले की, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत अनेक बॉलिवूड कलाकारांचे ड्रग्ज प्रकरणात नाव आले आहे. यात भारती आणि तिचा पती हर्ष यांच्या नावाचाही समावेश आहे. आज शनिवारी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी एनसीबीच्या पथकाला घरात ड्रग्ज आढळून आले. या प्रकरणी दोघांना समन्स देण्यात आले होते.

हे कलाकार देखील…

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात नाव आलेले हे काही पहिलेच कलाकार नाही. याआधी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल आणि त्याची पार्टनर गैब्रिएला डेमेट्रिएड्स यांचेही नाव यात आले असून त्यांची चौकशी देखील करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या