मोदी मुन्नाभाई तर अमित शाह सर्किट..गाण्यातून उडवली खिल्ली

131

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सध्या एका व्हिडिओने सोशल साईटवर धमाल उडवून टाकली आहे. तरुणांच्या एका चमूने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची गाण्यातून खिल्ली  उडवण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये मोदी मुन्नाभाई तर अमित शहांना सर्किटची उपमा देण्यात आली आहे. दोन मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून आतापर्यत ३६१,२२२ लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.

ईस्ट इंडिया कॉमेडी कंपनीतर्फे हा २ मिनिट ३३ सेकंदाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. यात १९९५ साली तुफान लोकप्रिय झालेल्या ’मेड इन इंडिया’ या गाण्याच्या चालीवर तयार करण्यात आलेल्या विनोदी गाण्याचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये एका स्टेजवर सहा तरुण गाणं गात असल्याचे दाखवण्यात आले आहे. गाण्याच्या सुरुवातीला मोदी यांच्या परदेश भ्रमंतीवर कडाडून टीका करण्यात आली आहे. नोटबंदी,त्याचे परिणाम,मोदींनी जनतेला दाखवलेले अच्छे दिनाचे गाजर आणि देशवासियांना मोफत इंटरनेट सेवा देणाऱ्या मोदीमित्र अंबानींचे आभार या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे. १९९५ साली आलिशा चिनॉय या गोड गळ्याच्या गायिकेच्या आवाजातल्या मेड इन इंडिया गाण्याच्या चालीवर हे गाणे तयार करण्यात आल्याने ते अधिकच श्रवणीय झाले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,उपाध्यक्ष राहुल गांधी,दिल्लीचे मुख्यंमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरही व्हिडिओतील गाण्यात टीका करण्यात आली आहे. देशातील बँकाना नऊ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याच्यावर काहीच ठोस कारवाई झाली नसल्याच्या मुद्दयावरही या विनोदी गाण्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

सध्या सोशल साईटवर सर्वाधिक पाहीला जाणारा हा व्हिडिओ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या