Mumbai 26/11 Attack – दहशतवाद्यांना भिडलेल्या कमांडोचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढलेल्या QRT (क्विक रिस्पॉन्स टीम) च्या जवानाचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अरविंद जहागू वाळवी (Arvind Jahagu Valvi) असे या 44 वर्षीय जवानाचे नाव आहे. नवी मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरविंद जहागू वाळवी हे कोळसेवाडी पोलीस स्थानकामध्ये कार्यरत होते. कल्याणमधील विजयनगर येथील ते रहिवासी होते. बुधवारी नवी मुंबईकडे दुचाकीवरून जात असताना महापे पुलावर शिळफाटा महापे लेनवर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अरविंद यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 20 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, असीस्टंट पोलीस इन्स्पेक्टर गणेश शिंदे यांनी अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, अरविंद यांचा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच एकही प्रत्यक्षदर्शिही समोर आलेला नाही. अरविंद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये पहिल्यांदा QRT (क्विक रिस्पॉन्स टीम) ची स्थापना करण्यात आली तेव्हा अरविंद वाळवी हे देखील या टीममध्ये होते. हरयाणा येथे अडीच महिने त्यांनी एनएसजी कमांडोंसोबत ट्रेनिंग घेतले होते.

मुंबईवर 2008 मध्ये हल्ला झाला तेव्हा ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल येथे कार्यरत होते. एनएसजी कमांडो येण्यापूर्वी QRT (क्विक रिस्पॉन्स टीम) नेच सुरुवातीला दहशतवाद्यांना रोखण्याचे काम केले होते. या दरम्यान अरविंद यांच्या साथिदाराला गोळीही लागली होती.