भीमा- कोरेगाव हिंसाचार; आयोग शरद पवारांनाही चौकशीसाठी बोलावणार?

241

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुढील सुनावणीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांसह प्रकाश आंबेडकर, शरद पवार आणि आरोपी मिलिंद एकबोटे यांना चौकशी समिती चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा चौकशी समितीकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी समितीने वर्षभरात काही साक्षीदार आणि नागरिकांची जबानी घेतली आहे. पुढील सुनावणीत या नेत्यांना बोलवण्यासह माओवाद्यांशी या प्रकरणाशी असलेला संबंधही तपासण्यात येणार आहे. आतापर्यंत समितीने सात साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या आहेत. त्यात या घटनेतील पीडितांचाही समावेश आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे.एन. पटेल, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांची समिती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. या प्रकरणाचा खटला पुण्यामध्ये सुरू आहे. या प्रकरणी काही व्यक्ती आणि संस्थाकडून आतापर्यंत 100 प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात चार सत्यशोधन अहवालही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सरकारकडून आणि राजकीय नेत्यांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची दखल घेत,त्यांना साक्षीदार म्हणून बोलवणार असल्याचे समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यात प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणाचे माओवाद्यांशी असलेले संबंधही तपासण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या