रवी शास्त्री यांचे भवितव्य ‘देवां’च्या हाती!

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

बीसीसीआयने आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या निवडीसाठी एक समिती बनवण्याचे ठरवले आहे. या समितीचे नेतृत्व  हिंदुस्थानचे  विश्वविजेते कर्णधार कपिलदेव यांच्याकडे असेल. कपिलदेव यांच्याबरोबर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची या समितीमध्ये निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे  टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक  रवी शास्त्री यांचे भवितव्य कपिलदेव यांच्या हाती असल्याचे म्हटले जात आहे, पण या गोष्टीवर अजूनही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. याबाबतेच वृत्त ‘जागरण’ या संकेतस्थळाने दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला  (सीएसी) काम करण्यास होकार दिल्यास मात्र नव्या समितीबाबत प्रश्न उभे ठाकतील. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीनंतरच नव्या समितीच्या कामकाजाला गो अहेडच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेंथ ऍण्ड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 30 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे. या प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी बीसीसीआयने त्रिसदस्यीय नवी समिती नेमली आहे.

विद्यमान प्रशिक्षकांना मिळणार 45 दिवस मुदतवाढ

सध्याच्या प्रशिक्षक वर्गाला 45 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. यापैकी सर्व जण नव्याने त्यांच्या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. पण ते असले तरी हिंदुस्थानी  संघाला नवे फिटनेस ट्रेनर आणि फिजिओ मिळणार आहेत. कारण सध्याच्या या दोन प्रशिक्षकांनी कार्यकाळ संपल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचे पद कायम राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या