CWG 2022 बॅडमिंटनमध्ये ‘डबल’ धमाका, सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनची सुवर्णपदकावर मोहोर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) हिंदुस्थानला आज दुसरे सुवर्णपदक मिळाले. बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत 20 वर्षीय लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने मलेशियाच्या टी याँगचा (Tze Yong) पराभव करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. लक्ष्यने हा सामना 19-21, 21-9 आणि 21-16 अशा तीन सेटमध्ये जिंकला.

मलेशियाचा खेळाडू सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानच्या किदंबी श्रीकांतचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचला होता. या पराभवाचा बदला लक्ष्य सेन याने घेतला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये तुल्यबळ लढत झाली. मात्र लक्ष्यने लागोपाठ केलेल्या काही चुकांमुळे हा सेट त्याच्या हातून 19-21 असा निसटला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र लक्ष्यने मलेशियाच्या याँगला अक्षरश: खेळवले आणि सेट 21-9 असा खिशात घातला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये लक्ष्यने चांगली सुरुवात केली. मलेशियाचा खेळाडू थकलेला वाटत होता आणि त्याचा पायही जायबंदी झाला होता. याचा पुरेपूर फायदा उठवत लक्ष्यने त्याला कोर्टवर चौफेर पळवले. त्यानंतर स्मॅश, विनर आणि अप्रतिम ड्रॉप मारत सेटसह सामना जिंकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

20 वे सुवर्णपदक

दरम्यान, हिंदुस्थानने आतापर्यंत 20 सुवर्णपदक जिंकले आहेत. लक्ष्य सेन याच्याआधी महिला एकेरीमध्ये पीव्ही सिंधू हिने कॅनडाच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे काल पाचव्या स्थानावर असणारा हिंदुस्थानचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला.