राष्ट्रकुल पदक विजेत्यांच्या बक्षीस रकमेत भरघोस वृद्धी, महाराष्ट्राच्या गुणी क्रीडापटूंच्या इनामात पाचपटीने वाढ

राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरिता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10  लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाखांऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कास्यपदक विजेत्या खेळाडूंना पाच लाखांऐवजी 20 लाख रुपये करण्यात आली आहे.

मंत्रालयातील पत्रकार परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांनी वरील माहिती दिली. देशातील पंजाब, हरयाणा राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱया बक्षीस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. ती जवळपास पाचपट वाढविण्यात आली आहे.  खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्याही बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी 12.50 लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 7.50 लाख रुपये तर कास्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 5  लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

राज्यातील 7  खेळाडूंना 8  पदके

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्रातील  एकूण 14  खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी राज्यातील 7  खेळाडूंनी 8  पदके प्राप्त केली आहेत. या खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना 3.50  कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये सुनील शेट्टी याने टेबल टेनिस (पुरुष सांघिक) या खेळामध्ये सुवर्णपदक, चिराग शेट्टी याने बॅडमिंटन (पुरुष दुहेरी) या खेळामध्ये सुवर्णपदक आणि मिक्स सांघिक या खेळामध्ये रौप्यपदक,  स्मृती मंधाना,  जेमिमा रॉड्रिग्स,  राधा यादव यांनी क्रिकेट (महिला संघ) या खेळामध्ये रौप्यपदक, संकेत महादेव सरगर वेटलिफ्टिंग (पुरुष 55  कि.ग्रॅ.) या खेळामध्ये रौप्यपदक, अविनाश साबळे ऍथलेटिक्स  (3 हजार मीटर स्टिपलचेस) या खेळामध्ये रौप्यपदक पटकावले आहे.