बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुलक्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा धमाका; महिलांच्या टी-20 स्पर्धेत आठ संघ भिडणार

तब्बल 24 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. 2022 सालामध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल गेम्समध्ये महिलांची टी-20 स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये अव्वल आठ महिला संघ जेतेपदासाठी झुंजतील. सर्व लढती एजबॅस्टन येथील क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडतील. ही स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याआधी 1998 सालामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला होता.

दक्षिण आफ्रिकेने जिंकले गोल्ड

1998 सालामध्ये कौलालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या दक्षिण आफ्रिकन संघाने गोल्ड मेडल जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने रौप्य, तर न्यूझीलंडने कास्य पदक पटकावले होते, मात्र या स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ नवव्या स्थानावर राहिला होता. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग व जॅक कॅलिससारख्या दिग्गज खेळाडूंनी आपआपल्या देशांचे प्रतिनिधित्व केले होते.

2028 लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश झाल्यानंतर आता ऑलिम्पिक या प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवामध्येही क्रिकेटचा समावेश होण्यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) व आयसीसीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. बीसीसीआयने ‘नाडा’च्या कक्षेत येण्याचा निर्णय घेतला असून आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश झालाय. त्यामुळे आता पुढील टार्गेट असेल ते 2028 सालच्या लॉस एंजिलिस  ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे, असे एमसीसी जागतिक क्रिकेट समितीचे चेअरमन माईक गॅटिंग म्हणाले.

खरंच महिला क्रिकेटसाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ मनू साहनी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या