डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी ठाणे पालिका आयुक्तांचा ऍक्शन प्लॅन, हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्डचे डोके थंड ठेवण्याचा फॉर्म्युला

तणावग्रस्त अवस्थेत रुग्णालयात येणाऱया रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना सौजन्याने वागा. त्यांना विश्वासात घ्या, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, अशा पद्धतीने हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्डना डोके थंड ठेवण्याचा फॉर्म्युला शिकवण्याचे निर्देश ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सुरक्षारक्षकांकडून चुकीची माहिती मिळाल्यास संतप्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाते. त्यामुळे डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आखलेल्या या ऍक्शन प्लॅननुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण हे विविध तपासण्यांसाठी येत असतात. तसेच त्यांच्यासोबत असणारे नातेवाईक असे मिळून साधारणपणे 4 ते 5 हजार नागरिकांची येथे दररोज वर्दळ असते. अशावेळी एखादा रुग्ण जर उपचारार्थ दाखल असेल तर त्याचे नातेवाईक हे रुग्णालयात वास्तव्यास असतात. आधीच आपल्या कुटुंबातील व्यक्ती दाखल असल्याने चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी एखाद्या सुरक्षारक्षकास काही माहिती विचारल्यास सुरक्षारक्षकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यास नागरिकांची चिडचिड होते, त्यातून अनेकदा भांडणेदेखील होतात व परिणामी एका व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे चिडलेले नागरिक हे संपूर्ण प्रशासनाला दोष देत डॉक्टर अथवा रुग्णालय प्रशासनातील कर्मचाऱयांवर हल्ला करतात. असे प्रकार घडू नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी फोर्सचे अधीक्षक रघुनाथ पालकर यांनी आयुक्त बांगर यांच्या निर्देशानुसार मार्गदर्शन केले.

चारही मजल्यांवर वॉच

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या चारही मजल्यांवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात पुरुष सुरक्षारक्षकांची संख्या 70 तर महिला सुरक्षारक्षकांची संख्या 11 इतकी आहे. ज्या ठिकाणी महिला रुग्ण असतात त्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रसूती कक्षाची सुरक्षादेखील महिला सुरक्षारक्षकांच्या हाती आहे.