पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्ध सोलापुरात माकपची निदर्शने; 28 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात निषेध दिन पाळण्याची आवाहन करण्यात आले होते. सोलापुरात पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शहरात विविध ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या मार्गदर्शनाखाली व माकपचे जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला. दत्त नगर शाखेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने करताना पोलिसांनी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माजी नगसेविका सुनंदा बल्ला यांच्यासह 28 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

कॉ. नरसय्या आडम म्हणाले की, मोदी सरकार कार्पोरेट माईंड वापरून जनतेच्या खिशाला कात्री लावत आहे. जनतेच्या श्रमाचा, घामाचा पैसा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत भरत आहेत. दोन लाख कोटी रुपयांची लूट सरकारने चालवली आहे, अशी टीका केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा दुष्परिणाम देशातील सामान्य नागरिकावर होत आहे. सरकारच्या कटकारस्थानांना जनता लवकरच उत्तर देईल, असेही ते म्हणाले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक, काळे झेंडे व काळ्या फिती लावून तीव्र निषेध नोंदवला.

आपली प्रतिक्रिया द्या