ती आणि तो…

171

अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

ती त्याच्यासाठीतो तिच्यासाठीएकमेकहेच दोघांचं खरं विश्व.

विचित्र शांतता पसरल्याचं त्यांच्या लक्षात आलं. खरंतर त्यांनी आधी सुरुवात केली होती मृत्यूची वाट चालायची. त्यांची एकेक इच्छा मरत चालली होती.

‘पेपर का वाचत नाही हो हल्ली?’

‘नीट दिसत नाही नं’.

‘ते काही नाही.. वाचा पाहू.. ’ म्हणत तिनं पेपर पुढय़ात टाकला. ‘मोठय़ानं वाचा. मला ऐकू आलं पाहिजे. आणि आज सूप केलंय  ते प्या. पोटात जायलाच हवं काहीतरी.’ तिनं तोंडाची गेलेली चव परत आणली.

‘किती तोंडातल्या तोंडात बोलता’?

‘जीभ तोंडातल्या तोंडात फिरते हल्ली.’

‘मग अथर्वशीर्ष म्हणा मोठय़ानं’. मुलांकडून म्हणून घ्यायची तसे श्लोक म्हणून घ्यायला लागली ती त्यांच्याकडून.

‘जगण्याची इच्छा संपणं म्हणजे मरण’ ती म्हणायची. आपण जगण्याचं स्वागत केलं तर आपल्याही ओंजळीत आयुष्य जास्तीचे क्षण टाकणार.. हेच तिचं म्हणणं होतं आणि आता?

‘अचानकच कोसळल्या.. आणि तिथल्या तिथे..’ सूनबाई रडत होत्या… त्यांच्या आयुष्याची ओंजळ रिकामी होताना तिनं त्यात नवीन श्वास भरले होते. मग ती कशी जाऊ शकते त्यांना सोडून? ते काठी सोडून तिच्याकडे गेले..

‘बाबा, बाबा सावरा स्वतःला..’ मुलगा म्हणत होता. पण ते तोवर तिच्याजवळ पोहोचलेही होते. तिचा देह पडला होता. निश्चल.. ‘डॉक्टरांना केलाय का फोन. त्यांचं सर्टिफिकेट लागेल नं..’ कुणीतरी म्हणालं..

ते तिच्याजवळ बसले आणि तिच्या छातीवर दोन्ही हातांनी दाब देत त्यांनी  तिला विशिष्ट प्रकारचा मसाज करायला सुरुवात केली.

‘बाबा, बाबा काय करताय?’ म्हणत मुलगा धावला तेव्हा त्याला ढकलताना त्यांच्या अंगात एवढा जोर कुठून आला हे त्यालाही कळलं नाही. त्यांचा आवेश पाहून सारेच चक्रावले… आणि त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. दोन्ही हात एकमेकात गुंतवून छातीच्या मध्यभागी ते दाब देत होते, हात पुन्हा उचलत होते, पुन्हा दाब देत होते.

‘तू अशी जाऊ शकतच नाहीस.. मला सोडून.. मी आजवर ऐकत आलो ना तुझं.. आता तुलाही माझ्या प्रयत्नांना साथ द्यावीच लागेल.. तसं ठरलंच आहे आपलं.. सप्तपदीच्या वेळीच. माझा हात धरून चालली होतीस तेव्हा, मग असा हात मधेच कसा सोडता येईल तुला?’ त्यांच्या मसाज करण्याला एक शास्त्रशुध्द होती. विशिष्ट लय होती. तिनंच त्यांना व्हिडीओ दाखवला होता. नातवाच्या मोबाईलवर..

‘हे पहा.. हा डॉक्टर काय सांगतोय.. अचानक हृदय बंद पडलं तर वज्रासनात बसून दोन हात एकमेकात गुंतवून छातीच्या मध्यभागी दाब देत रहायचा.. पुन्हा सगळं सुरळीत होतं.’  त्या दोघांनी तो व्हिडीओ पुनःपुन्हा पाहिला होता. आणि तिनं सांगितलेला शब्द न् शब्द त्यांनी आजवर पाळला होता. आजही ते तेच तर करत होते. ते एकटक बघत होते तिच्याकडे. तिचे ओठ बंद होते.. पण तिचे शब्द त्यांना ऐकू येत होते.

‘जगण्याची इच्छा संपणं म्हणजे मरण.’ छे! आणि तिची जगण्याची इच्छा कुठे संपली होती? अजून त्यांना कितीतरी फिरायचं होतं. जुन्या आठवणीत रमायचं होतं.. नातसुनेला बघायचं होत.. आणि पणजी पणजोबा झाल्यावर सोन्याची फुलं उधळायचंदेखील त्यांनी ठरवलं होतं.. तिला ते तेच तर सांगत होते, म्हणत होते, ‘कामं सोडून पळायचा बेत आहे का तुझा? चालणार नाही.. मी तो खपवून घेणार नाही. यमराजाला परत पाठवलं असेल सावित्रीनं त्या काळात, तर मलाही जमेल ते.’ ती त्यांची फक्त बायको नव्हती. आई होती, मैत्रीण होती.. आताही ते तिला निक्षून तेच सांगत होते, तू उठली नाहीस तर मी झोपेत कायमचा, इथेच तुझ्याजव.. त्यांच्या डोळ्यातला एक अश्रू तिच्या डोळ्यावर पडला. सुनेनं मुलाला खूण केली. डॉक्टर आले होते. आता कदाचित दोघातिघांना त्यांना उचलूनच बाजूला करावं लागणार होतं. तिचं जाणं त्यांना सहन न होणं स्वाभाविक होतं. दोघे पुढं सरसावले.. त्यांनी बाबांना धरलं आणि त्याच क्षणी तिनं डोळे उघडले.. कारण तिलाही माहिती होतं, तिनं त्यांचं ऐकलं नसतं तर त्यांनी त्यांचं म्हणणं खरं केलं असतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या