बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला साडेचार कोटींचा चुना

935
फोकलिफ्ट खरेदी करण्याच्या बहाण्याने मे. कमल सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीच्या नावाचे बनावट इनव्हॉईसेस तसेच अन्य बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे आयसीआयसीआय बँकेकडून चार कोटी 61 लाखांचे कर्ज घेतल्यानंतर बँकेची फसवणूक करणारा व पोलिसांना गुंगारा देत विविध ठिकाणी लपणारा मे. लिवे लॉजिस्टिक लि. कंपनीचा संचालक अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला.
संजय सिन्हा असे त्या झोलरचे नाव असून तो मे. लिवे लॉजिस्टिक लि. कंपनीचा संचालक आहे. सिन्हा याने अन्य साथीदारांच्या मदतीने मे. कमल सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीकडून फोकलिफ्ट खरेदी करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने त्या कंपनीच्या नावे बनावट इनव्हॉईसेस तसेच अन्य कागदपत्रे बनविली. त्या कागदपत्रांच्या आधारे सिन्हाने आयसीआयसीआय बँकेकडून चार कोटी 61 लाख 85 हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्या रकमेची बँकेला परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेचे मुख्य प्रादेशिक अधिकारी उपाध्याय यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी, एसीपी किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाबळे, एपीआय पल्लवी कुलकर्णी, दीपक कदम तसेच उमेश लांघे व सिद्धार्थ डावरे या पथकाने पसार झालेल्या सिन्हाचा शोध सुरू केला. अखेर तो अंधेरी पूर्वेकडील ऑरीओल या हॉटेलात असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी तेथे धडक देऊन संजय सिन्हा याला अटक केली.
आपली प्रतिक्रिया द्या