शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपनीला पनवेल उपविभागीय अधिकाऱ्यांचा झटका

620

अदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांचा जुना पायवाटेचा रस्ता बंद करून अडवणूक करणाऱ्या दादाजी धाकजी लॉजिस्टिक कंपनीला पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी झटका दिला असून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दादाजी धाकजी लॉजिस्टीक प्रा.लि. यांनी सदरहू सर्व्हे नंबर 122/2 मधील शेतीवर, रस्त्यावर दगड,मातीचा भराव टाकून शेतजमिन व जुना वहिवाटीचा रस्ता जून 2017 मध्ये बुजविण्यास सुरुवात केली. तसेच पर्यायी रस्ता म्हणून नाल्यातून नव्या दोन फुटांच्या रस्त्याची निर्मिती केली. त्यामुळे या परिसरातील शेतीवर, डोंगर परिसरात ये -जा करणाऱ्या शेतकऱ्यांना, आदिवासी बांधवांना, गुरे-ढोरे यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कळंबुसरे,मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी तसेच कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत,तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. तसेच जूना वहिवाटीचा रस्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी तहसीलदार, उरण यांच्याकडील मामलेदार कोर्ट कायदा 1906 चे कलम 5(2) अन्वये दावा दाखल केला.

परंतु उरण तालुका तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांनी शेतकऱ्यांची हरकत फेटाळली होती. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंळबुसरे गावातील शेतकरी रत्नाकर दगडू राऊत, संतोष वामन राऊत, बाळकृष्ण कृष्णा पाटील, मनोहर हिऱ्या कातकरी, बाबूराव कमल्या कातकरी सह इतर शेतकरी, आदिवासी बांधवांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी उप विभागीय अधिकारी, पनवेल विभाग यांचे न्यायालयात पुनर्विलोकन अपिल दाखल केले होते. माजी न्यायाधीश अॅड चंद्रहास बळीराम पाटील, निवृत्त तहसिलदार डी.बी.पाटील, अॅड प्रदिप म्हात्रे, अॅड. योगेश म्हात्रे यांनी उप विभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या समोर शेतकऱ्यांची बाजू मांडली.

वस्तुस्थितीजन्य पुरावे आणि गुगल मॅप वरून जुनी पायवाट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे नवले यांनी हा रस्ता शेतकऱ्यांच्या पायवाटीसाठी मोकळा करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे हक्काचा वंश परंपरागत वहिवाटीचा रस्ता मिळाल्याने शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी, आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या