कोरोनाग्रस्तांच्या आत्महत्या प्रकरणातही भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

कोरोना रुग्णाने आत्महत्या केली असेल तर त्या प्रकरणातही रुग्णाच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा विचार करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. कोरोना संसर्गामुळे होणाऱया त्रासाला वैतागूनच त्या रुग्णाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोनाबळींचे मृत्यू प्रमाणपत्र आणि भरपाईबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्राने नवीन नियमावली तयार केली आहे. त्याची दखल घेताना न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला कोरोना रुग्णांच्या आत्महत्येसाठीही कुटुंबीयांना भरपाई देण्याचा विचार करण्याचे सुचवले. न्यायालयाने केंद्राच्या नियमावलीवर समाधान व्यक्त केले. मात्र तीन ते चार मुद्दय़ांवर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर न्यायालयाच्या सूचनांना अनुसरून नियमावलीमध्ये दुरुस्ती करण्यास केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तयारी दर्शवली.

आपली प्रतिक्रिया द्या