फयान वादळाच्या धर्तीवर ‘ओखी’ नुकसानग्रस्तांना भरपाई – दीपक केसरकर

144
दांडी किनारी नुकसान ग्रस्त मच्छीमारी नौकेची पाहणी करताना पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक. (छाया - अमित खोत)

सामना प्रतिनिधी, मालवण

अरबी समुद्रात घोंगावलेल्या ओखी चक्रीवादळाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागास बसला असून यात मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फयान वादळाच्या धर्तीवर मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यानुसार नुकसानीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिली.

ओखी चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मच्छीमारांच्या बोटी, पोलिसांची सिंधू-५ गस्तीनौका बुडाल्याने झालेल्या नुकसान व आचरा, देवबाग, दांडी किनारी झालेल्या मच्छिमार नुकसानीची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हेही उपस्थित होते.

तत्पूर्वी महापरीनिर्वाण दिनानिमित्त शहरातील बांगीवाडा येथील समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर जिल्हा परिषद विश्रामगृह येथे त्यांनी विविध खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेत आढावा घेतला. यावेळी प्रांत डॉ. विकास सूर्यवंशी, नायब तहसीलदार सुहास खडपकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पोलिस निरीक्षक अरविंद बोडके, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, पत्तनचे अधिकारी बोथीकर, आचरा पोलिस ठाण्याचे अधिकारी, डॉ. संजय पोळ, पी. डी. पाटील यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी तसेच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सामंत, तालुका प्रमुख बबन शिंदे, जि.प. सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, नगरसेवक पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, महिला तालुकाध्यक्षा श्‍वेता सावंत, मेघा गावकर, अंजना सामंत, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, दीपक मयेकर आदी  उपस्थित होते.

आचरा जामडूलवाडी येथे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांकडून याची दखल न घेतल्याने केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गस्तीवर असणार्‍या संबंधित कर्मचार्‍यांना आवश्यक ती सूचना द्यावी असे आचरा पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सांगितले. आचर्‍यात ज्याठिकाणी पाणी घुसले त्याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न करावेत यासाठी तत्काळ पाहणी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागास दिले. ज्या विहिरींमध्ये खाडीचे पाणी घुसले त्या पाण्याचा उपसा करून आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्यात यावी तोपर्यंत त्या भागातील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले.

तालुक्याच्या किनारपट्टी भागात दांडी, देवबाग येथील पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांचे तसेच जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे ही परिस्थिती ओढवल्याने फयानच्या धर्तीवर या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. त्यानुसार झालेल्या नुकसानीचा तत्काळ अहवाल शासनास सादर करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. पोलिसांच्या गस्तीनौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तोपर्यंत देवगड येथील एक गस्तीनौका येथे आजच मागवून घ्यावी अशा सूचना त्यांनी पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांना दिल्या.

येथील समुद्रात बंदर विभागाच्यावतीने बोया टाकण्याची कार्यवाही अद्यापही केली नसल्याचे दिलीप घारे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार संबंधित ठेकेदारास बोया टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याची कार्यवाही लवकरच केली जाईल असे बंदर निरीक्षक कुमठेकर यांनी स्पष्ट केले. किनारपट्टी भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाचा एकही अधिकारी फिरकला नाही. मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांकडून मच्छीमारांना उद्धट उत्तरे दिली जात आहेत. वादळ सदृश परिस्थिती निर्माण होणार याची कल्पना असतानाही मत्स्य व्यवसायचे परवाना अधिकारी श्री. वारूंजीकर हे रजेवर गेले. त्यामुळे मच्छीमारांच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत असे मच्छीमारांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय खात्यातील रिक्त पदांबाबत मुंबईत बैठक घेण्यात आली होती. मात्र त्याची अद्याप कार्यवाही न झाल्याने लवकरच पुन्हा बैठक घेऊन मत्स्य व्यवसाय खात्यातील रिक्त पदांचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल असे केसरकर यांनी सांगितले.

गतवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांची ३५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई विम्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून त्याचे वाटप लवकरच केले जाईल. गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे आंबा, काजू बागायतीचे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज वर्तविणे अशक्य आहे. त्यामुळे ज्यावेळी उत्पन्न निश्‍चित होईल त्यावेळीच नुकसान झाले की नाही याचा विचार करून बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याचा विचार केला जाईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात ४०० डॉक्टर भरती
जिल्ह्यात डॉक्टरांअभावी अनेक समस्या भेडसावत असून नुकतीच ४०० डॉक्टर्संची भरती राज्यात झाली आहे. यातील जास्तीत जास्त डॉक्टर्स जिल्ह्याला प्राधान्याने दिले जातील असे आश्‍वासन आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

बंधारे सीआरझेडमुळे रखडले
देवबागसह अन्य ठिकाणच्या बंधार्‍याच्या कामासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र सीआरझेडच्या समस्येमुळे या बंधार्‍याचे काम रखडले आहे. त्यामुळे हे बंधारे वेगळ्या पद्धतीने व्हावेत यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या