अवकाश संशोधनातील स्पर्धांचे आव्हान

159

<< अभय मोकाशी >>

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पुढच्या महिन्यात एकाच वेळी १०३ उपग्रहांचे प्रक्षेपण करून अवकाश तंत्रज्ञात एक मोठी झेप घेत आहे. गेल्या काही दशकांत इस्रोने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. हिंदुस्थानचेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रहदेखील इस्रोने अंतराळात पाठविले आहेत.

हे करत असताना इस्रोला मोठय़ा आव्हानाला तयार राहावे लागणार आहे. उपग्रह अंतराळात पाठविणे अति खर्चाचे आहे, तरीदेखील अनेक देश आपले उपग्रह पाठविण्याच्या मार्गावर आहेत आणि अशा वेळी त्यांना आपल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे.

हिंदुस्थानने एकाच वेळी अनेक उपग्रह पाठविण्याच्या तंत्रज्ञानाचा विकास उत्तमरीत्या केला आहे. हे करत असताना उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न चालू झाला.

हिंदुस्थानने पुन्हा वापरता येईल असे रेयूसेबल लॉंच वेहिकल (आरएलव्ही), म्हणजेच उपग्रह अंतराळात घेऊन जाणारे वाहन, विकसित करण्यास सुरुवात केली. आपले संशोधन योग्य दिशेने चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी इस्रोने २००६ साली आवाजाच्या सहापट वेगाने इंधनाचे ज्वलन करणाऱया तंत्रज्ञांची चाचणी जमिनीवरच केली. या तंत्रज्ञानाला स्क्रामजेट (सुपरसॉनिक कंबशन रॅमजेट) म्हणतात.

अशा प्रकारची चाचणी अमेरिकेने त्याआधीच करून दाखविली होती, मात्र ती चाचणी उड्डाणात काही सेकंद केली होती. हिंदुस्थानने ही चाचणी केली तेव्हा जपान, रशिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथे या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास चालू होता.

इंधनाचे ज्वलन होण्यासाठी इंधनाबरोबर ऑक्सिजनची गरज असते आणि हा वायूदेखील यानात उपलब्ध करावा लागतो. ऑक्सिजनचे वजन कमी करण्यासाठी हवेतील प्राणवायू या तंत्रज्ञानात वापरला जातो.

जमिनीवरील या चाचणीनंतर काढण्यात आलेल्या आपल्या प्रसिद्धी पत्रकात इस्रोने म्हटले होते की, त्यावेळी अंतराळात उपग्रह अथवा साहित्य पाठविण्याचा खर्च प्रतिकिलो १२,००० ते १५,००० डॉलर असून तो प्रतिकिलो ५०० ते १००० डॉलरपर्यंत आणण्याचा प्रयत्न इस्रो करत आहे.

आपण विकसित केलेल्या आरएलव्हीची चाचणी इस्रोने मे २३, २०१६ रोजी केली. हे यान पृथ्वीपासून ६५ किलोमीटरवर गेले आणि तेथून यानने आपला परतीचा प्रवास सुरू केला. हे यान पृथ्वीवरील वातावरणात आवाजाच्या पाचपट वेगाने शिरले. अशावेळी वातावरणाशी होत असलेल्या घर्षणाने उत्पन्न झालेल्या तापमानाने यान जळणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. थर्मल प्रोटेक्शन सिस्टमने हे साध्य होते आणि याचा विकास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी उत्तम प्रकारे केला. याचबरोबर पृथ्वीवर परत येणारे यान योग्य ठिकाणी आणि योग्य गतीने उतरविणे आवश्यक असते आणि हेदेखील इस्रोने साध्य करून दाखविले. हे यान ७७० सेकंदाच्या प्रवासानंतर श्रीहरीकोटापासून ४५० किलोमीटरवर बंगालच्या खाडीत उतरले.

या यशाने उत्साहित होऊन इस्रोने सप्टेंबर २६, २०१६ रोजी आठ उपग्रह अंतराळात सोडले. यापैकी पाच उपग्रह हिंदुस्थानातील तसेच अल्जेरिया, अमेरिका आणि कॅनडा या देशांचे प्रत्येकी एक होते. या आठ उपग्रहांचे वजन ६७५ किलो होते. हे तंत्रज्ञान संपूर्णपणे हिंदुस्थानात विकसित करण्यात आले आहे, मात्र याचा सध्या गवगवा होत असलेल्या मेक इन इंडियाशी काहीही संबंध नाही. इतर काही देशांत या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे काम चालू आहे. यात चीन, फ्रान्स, जर्मनी, उक्रेन आणि रशियाचा समावेश आहे.

आजवर अवकाश तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर विविध देशांत सरकारी संस्थाद्वारा केला जात होता, मात्र आता यात खासगी संस्थांनी उडी घेतली आहे. या संस्थांनी याकडे व्यवसाय म्हणून पाहिले आहे. येत्या काळात अवकाश तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात होणार आहे. अनेक देश याचा वापर करणार आहेत, विशेष करून दळणवळणासाठी. सर्वच देशांना प्रक्षेपणाचा खर्च परवडणारा नसून यासाठी त्यांना उपग्रह वाहून नेणाऱया संस्थांची गरज आहे.

आपण अशा प्रकारची संस्था आहोत हे इस्रोने जरी दाखविले असले तरी इस्रोला या क्षेत्रात खूप प्रगती करण्याची गरज आहे. इस्रो आणि त्या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे तसेच कर्मचाऱयांचे कौतुक आहे, पण या  क्षेत्रात आपण अजून खूप प्रगती करायची आहे याची त्यांना जाणीव आहे. आजवर इस्रोने इतरांच्या ज्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले ते लहान आणि कमी वजनाचे होते.

वजन नेण्याच्या क्षमतेला पेलोड म्हणतात. इस्रोने ६७५ किलोचा पेलोड अवकाशात नेला आहे, पण हा पेलोड मोठय़ा प्रमाणात वाढविण्याचे गरजेचे आहे.खासगी क्षेत्रात दोन मोठय़ा संस्था आल्या आहेत. या दोन्ही संस्था इंटरनेटच्या जगात नाव आणि पैसा कमाविलेल्या व्यक्तींनी सुरू केल्या आहेत.

ऍमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बिझोस आणि रॉब मायर्स्न यांनी ब्लू ओरिजिन ही अवकाश पर्यावरणाची संस्था सुरू केली. ब्लू ओरिजिनने न्यू शेपर्ड हे पुन्हा वापरता येईल असे प्रक्षेपण वाहन आहे. न्यू शेपर्डची चाचणी २०१५ मध्ये करण्यात आली. या वर्षी ब्लू शेपर्ड प्रवाशांना घेऊन जाण्याची चाचणी करणार आहे आणि २०१८ सालापासून नियमितपणे प्रवाशांना अंतराळात नेण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

नोव्हेंबर २३, २०१५ रोजी झालेल्या चाचणीत न्यू शेपर्ड पृथ्वीपासून १००.५ किमीवर जाऊन परतले. हे यान पृथ्वीवर उभ्या अवस्थेत उतरले. न्यू शेपर्डने जरी हिंदुस्थानच्या अवकाश यानापेक्षा अधिक अंतर कापले असले तरी इस्रोला ब्लू ओरिजिनबरोबर स्पर्धा करण्याची गरज नाही, कारण या संस्थेला अवकाशात उपग्रह न्यायचे नसून प्रवाशांना न्यायचे आहे.

इस्रोला खरी स्पर्धा करावी लागणार आहे ती स्पेसएक्स या संस्थेशी. पेपॅल या संस्थेचे संस्थापक एलोन मस्क यांनी केली आहे. गुगल आणि फिडिलिटी या आणि इतर काही निधी कंपन्यांच्या मदतीने मस्क यांनी एक अब्ज डॉलर आपल्या अंतराळ प्रकल्पांसाठी उभे केले आहेत.

स्पेसएक्सने फॅलकन ९ हे पुन्हा वापरता येईल असे यान बनविले आहे. याचबरोबर स्पेसएक्सने ड्रगन या अंतराळयानाची निर्मिती केली आहे. ड्रगनने २०१२ साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला साधन सामग्री पुरविली आणि इतिहास रचला. ड्रगन माणसे आणि सामान वाहू शकते. डॅगन ६००० किलो वजन अंतराळात घेऊन जाऊ शकते आणि ३००० किलो वजन घेऊन पृथ्वीवर उतरू शकते.

हिंदुस्थानला या शर्यतीत उतरायचे असेल तर संशोधनावर अधिक खर्च करणे आवश्यक आहे. स्पेसएक्सला आर्थिक पाठबळ आहे, पण इस्रोच्या सेवा स्वस्तात आहेत हे महत्त्वाचे आहे.हिंदुस्थानातली अति उत्साही व्यक्ती इस्रो लवकरच हनुमान झेप घेणार आहे असा दावा करीत आहेत, पण तसे होण्यासाठी एक दशक तरी लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या