रवीना टंडनविरोधात भुवनेश्वरमध्ये गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडन अडचणीत सापडली आहे. भुवनेश्वर येथील श्री लिंगराज मंदिरात मोबाईल वापरल्याप्रकरणी तिच्यावर लिंगराज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगराजच्या मंदिर प्रसासनाने याबाबत तक्रार दाखल केली होती. लिंगराज मंदिर ‘नो कॅमेरा झोन’ असतानाही रविना त्याठिकाणी जाहिरातीचं चित्रीकरण करत होती, असा मंदिर प्रशासनाने आरोप केला आहे.

रवीना टंडन रविवारी दुपारी भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात गेली होती. तेथे तिने एका जाहिरातीचं चित्रीकरण केलं. रविनाचा मंदिरातील चित्रीकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनानं पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. रविनाने मंदिरात चित्रीकरणासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या घटनेमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

या घटनेनंतर बोलताना रवीनाने सागितलं की, ‘मंदिरात फोन नेण्यास बंदी असल्याचं मला माहिती नव्हत. मंदिरात उपस्थित अनेकांकडे फोन होते आणि ते त्याठिकाणी सेल्फीही काढत होते. मंदिरात एका व्यक्तीने मला माझ्या सौंदर्याचं आणि फिटनेसबाबत विचारणा केली. त्याबाबत मी त्याला सांगत असताना त्याने माझा व्हिडीओ तयार केला. मी सगळ्याच मंदिरांचा आदर करते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.’