शिवसृष्टीचा निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन

30

सामना प्रतिनिधी । पुणे

कोथरूड येथील शिवसृष्टीबाबत सातत्याने फक्त आश्वासने दिली जात आहे. त्यामुळे येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन आणि उपोषणाचा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी दिला आहे. त्यावर याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करू, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी करण्याबाबत सर्वसाधारणची खास सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात होताच दीपक मानकर म्हणाले, पालकमंत्री गिरीश बापट यांनी तीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात मुंबईत मेट्रोचे अधिकारी तसेच महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत शिवसृष्टी आणि मेट्रो स्टेशन हे दोन्ही प्रकल्प एकाच जागेवर होतील, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अशीच संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला. मात्र, त्याला तीन महिने झाले, त्यावर मुख्यमंत्री पुण्यात अनेक वेळा येऊन गेले तरीही ही बैठक झालेली नाही. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत बैठक झाली नाही तर त्याचदिवशी मेट्रोचे काम बंद पाडण्यात येईल, तसेच पौड रस्त्यावर शिवप्रेमी कार्यकर्ते उपोषणास बसतील, असा इशारा मानकर यांनी दिला.

शिवसृष्टीचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. शिवसृष्टीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनालाही शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि विशाल धनवडे यांनी सांगितले. नगरसेवक अ‍ॅड. गफूर पठाण, सुंडके यांची भाषणे केली. महापौर टिळक यांनी यावर काहीही आश्वासन दिले नाही. मात्र, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत आहोत. ते बुधवारी पुण्यात आहेत, त्यामुळे झाली तर उद्याच अन्यथा पुढील आठवड्यात बैठकीचे नियोजन करू, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. आता ही सभा येत्या ९ फेब्रुवारीला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या